नाइट लाइफसाठी पालिका सुरक्षेचा आढावा घेणार

427

मुंबईत 26 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या नाइट लाइफसाठी पालिका सुरक्षेचा आढावा घेणार आहे. पोलिसांसोबत होणाऱया या संयुक्त कार्यवाहीत मॉल्स, दुकाने, हॉटेल्स-रेस्टॉरंट अशा ठिकाणांच्या सुरक्षेचा आढावा घेतला जाणार आहे.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी कालच मुंबईत 26 जानेवारीपासून नाइट लाइफ सुरू होणार असल्याचे जाहीर केले. प्रायोगिक तत्त्वावर नरीमन पॉइंट, काळा घोडा, बीकेसी आणि मॉल्ससारख्या अनिवासी भागात ही नाइट लाइफ सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांबरोबरच पालिकेलाही संबंधित ठिकाणच्या सुरक्षेचा आढावा घेणे गरजेचे आहे. त्यामुळे पोलिसांसोबत पालिकाही सुरक्षेचा आढावा घेणार असल्याचे एका पालिका अधिकाऱयाने सांगितले. यानुसार पालिकेचे विभाग कार्यालय पोलिसांच्या मदतीने सुरक्षेचा आढावा घेऊन त्या परिसरात अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था ठेवण्याबाबत निर्णय घेणार आहे. पहिल्या टप्प्यात अनिवासी क्षेत्रातील काही हॉटेल्स, मॉल्स-मल्टिप्लेक्स रात्रभर खुली राहणार आहेत. अशा ठिकाणांवर कडेकोट लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच चौपाटीसारख्या ठिकाणी खाद्यपदार्थ विकण्याची परवानगी असेल. मात्र कायदा-सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता असणाऱया ठिकाणी बंधने घालण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

सुरक्षेच्या उपाययोजना बंधनकारक

नाइट लाइफच्या ठिकाणी संबंधितांना स्वतःचे प्रवेशद्वार, सुरक्षाव्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे असलेल्या मॉल्स आणि चित्रपटगृहांसारख्या आस्थापनांमधील दुकाने, उपाहारगृहे 24 तास सुरू ठेवता येणार आहेत. अनिवासी क्षेत्रातील नाइट लाइफची उपयोगिता पाहून ही क्षेत्रे वाढवण्यात येणार असून अग्निसुरक्षा आणि सुरक्षाव्यवस्थेची अटही संबंधितांना घालण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या