नळबाजारमधील नूरानी बिल्डिंग जमिनीकडे झुकली

60

सामना प्रतिनिधी। मुंबई

नळबाजार हा सणासुदीच्या दिवसांत खरेदीच्या गर्दीने ओसंडून वाहणारा परिसर. याच गर्दीतून वाट काढणाऱया ग्राहक व दुकानदारांनाही परिसरातील मोडकळीस आलेल्या इमारतींची भीती हैराण करते आहे. 65 वर्षांपूर्वी बांधलेली नूरानी बिल्डिंग (नं. 242/244) ही यापैकीच एक. ती जमिनीकडे झुकली आहे. निव्वळ जागामालकाच्या निष्काळजी व आडमुठय़ा भूमिकेमुळे आम्ही मृत्यूच्या दाढेत राहतोय, असा दावा येथील भाडेकरू करत आहेत.

तळमजला अधिक चार माळे असलेल्या नूरानी बिल्डिंगच्या भिंतीमध्ये झाडे वाढली आहेत. भिंतींना मोठमोठे तडे गेले असून तिसऱया माळ्यापासून बिल्डिंग एका बाजूला झुकली आहे. त्यामुळे ही बिल्डिंग कोणत्याही क्षणी कोसळेल अशी स्थिती आहे. डोंगरी दुर्घटनेनंतर येथील भाडेकरूंची झोप उडाली आहे. कामानिमित्त घराबाहेर गेलो तर घरात असलेले सुखरूप आहेत की नाही याची चिंता सतत सतावते, अशी प्रतिक्रिया रहिवासी मोहम्मद हयात खान यांनी दिली. मोडकळीस आलेल्या या बिल्डिंगमध्ये 24 भाडेकरू आहेत. तळमजल्याला जागामालकाचीच दोन दुकाने आहेत. तुम्हाला मरणाची भीती वाटत असेल तर दुसरीकडे राहायला जा, असा बेजबाबदार सल्ला जागामालक देत असल्याचे खान यांनी सांगितले. चार माळ्यांच्या बिल्डिंगचे लाकडी जिने मोडकळीस आले आहेत. बिल्डिंगचा बराचसा भाग अंधारलेला आहे. अशा अंधारातून वाट काढून चौथ्या माळ्यावर राहणारी मुले शाळेत ये-जा करतात. ही बिल्डिंग शेजारच्या घासवाला बिल्डिंगवर कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे तेथे राहणाऱया 12 भाडेकरूंच्याही जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे.

आमच्या सुरक्षेबाबत बिल्डरला काहीच देणेघेणे नाही. आम्ही पालिकेकडे तक्रार केलीय. बिल्डिंगचे अजून स्ट्रक्चरल ऑडिट झालेले नाही. आम्ही म्हाडाकडे पाच हजार रुपये भरलेत. प्रशासन आम्हाला मागाठणेतील ट्रान्झिट कॅम्पमध्ये जायला सांगतेय, पण मुलांचे शिक्षण, व्यवसाय इथले असल्याने घर सोडवत नाही. जागामालकही आमच्या जिवाशी खेळतोय. असे मोहम्मद हयात खान या रहिवाशाने म्हटले आहे.

मी व पती आम्ही दोघेच घरामध्ये राहतो. दोघेही दिव्यांग आहोत. पती तर गतिमंद आहे. प्रशासनाने आम्हाला बोरिवलीतील ट्रान्झिट कॅम्पमध्ये जायला सांगितलेय. दिव्यांग असल्यामुळे नोकरीसाठी लोकलची दगदग करू शकत नाही. सर्व नातेवाईकही याच परिसरात राहतात. दुसरा कोणाचा आधार नसेल तर आम्ही दिव्यांगांनी दुसऱया परिसरात जाऊन कसे राहायचे? सकिना कासीम तिनवाला, रहिवासी

आवाहन
मुंबईत शेकडो, हजारो इमारती धोकादायक म्हणून सरकारदरबारी नोंदलेल्या आहेत, पण त्यापलीकडेही ही यादी असू शकते. दुसरा कोणताच पर्याय नसल्याने अशा मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये कितीतरी कुटुंबे डोक्यावर भीतीची टांगती तलवार घेऊनच राहत आहेत. खोली रिकामी केली तर ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये खितपत पडावे लागेल ही भीती असते आणि या भीतीपोटीच मृत्यूची भीती आपलीशी केली जाते. वाचकहो, तुमच्या अशा इमारतींची किंवा तुमच्या शेजारची इमारत अशी भीतीच्या टेकूवर उभी असेल तर आम्हाला माहिती द्या! ई-मेल ः [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या