पोलीस आयुक्तांचा दर मंगळवारी जनता दरबार, पूर्वपरवानगीविना थेट भेटता येणार

नागरिकांच्या सेवेसाठी पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी दर मंगळवारी जनता दरबार सुरू केला आहे. कोणतीही पूर्वपरवानगी न घेता थेट आयुक्तांना भेटून नागरिकांना आपल्या तक्रारींचे निरसन करता येणार आहे. याचा नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नागरिकांच्या अनेक तक्रारी असतात. पोलीस ठाणे किंवा वरिष्ठ अधिकाऱयांच्या कार्यालयांच्या पायऱया झिजवूनही दाद न मिळाल्यास लोक पोलीस आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न करतात; परंतु त्यासाठी पूर्वपरवानगी घ्या आदी नियम व अटी पूर्ण कराव्या लागतात. त्यामुळे नेमकी कधी भेट होईल, आयुक्तांच्या भेटीची वेळ मिळेल का, असे अनेक प्रश्न उपस्थित व्हायचे. परिणामी नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटायचा. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करत आयुक्त देवेन भारती यांनी स्वतः नागरिकांच्या तक्रारी, अडीअडचणी ऐकून त्याचा झटपट निपटारा करायचे ठरवले आहे. याकरिता दर मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता पोलीस आयुक्त कार्यालयातील प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यावर आयुक्त भारती यांनी जनता दरबार सुरू केला आहे.

विशेष म्हणजे, कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय या दरबारात उपस्थित राहून नागरिकांना आपली गाऱहाणी थेट पोलीस आयुक्तांकडे मांडता येणार आहेत. मी तुमच्या तक्रारी ऐकण्यासाठी उपलब्ध आहे, कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही असे आयुक्तांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.