
मुंबईत येत्या रविवारी पोलीस, सामान्य नागरिक तसेच धावपटू एकसाथ दौड करणार आहेत. निमित्त आहे पहिल्या महाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे. मायानगरीत पहिल्यांदाच आयोजित या मॅरेथॉनमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व स्थानिक धावपटू यांच्यासह जवळपास 17 हजार स्पर्धक सहभागी होणार आहेत.
चार टप्प्यांत ही मॅरेथॉन होणार असून त्यात 700 पूर्ण मॅरेथॉनर, 3250 अर्धमॅरेथॉनर, 5576 दहा माईल रनर्स आणि 7907 पीच किमी रनर्सचा सहभाग असणार आहे. तसेच या मॅरेथॉनमध्ये विजेते ठरणाऱया धावपटूंना लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात येतील. त्यात पूणवेळ, अर्धवेळ गटातील धावपटूंचा समावेश असेल. शिवाय पोलीस दलातील विजयी धावपटूंनादेखील बक्षीस देऊन गौरविण्यात येणार असल्याचे पोलीस महानिरीक्षक व मॅरेथॉन आयोजनाचे संचालक कृष्णप्रकाश यांनी सांगितले. सिने अभिनेते अजय देवगण, अक्षयकुमार, सुनील शेट्टी, फरहान अख्तर हेदेखील त्यावेळेस उपस्थित राहणार आहेत. स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी राज्याचे मंत्रीदेखील येतील, असेही त्यांनी सांगितले.
डॉक्टरांचे पथक, हॉस्पिटलची मदत
मॅरेथॉनदरम्यान स्पर्धकांना काहीही त्रास झाल्यास प्रसिद्ध क्रीडा औषधतज्ञ डॉ. आशीष कॉण्टॅकर व त्यांचे पथक ठिकठिकाणी तैनात राहणार आहे. 21 कॅर्डियाक ऍम्ब्युलन्स, पाच हॉस्पिटलमध्ये आयसीयूत बेडची उपलब्धता आदी सुविधा तैनात ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय पाणी, मेडिसीन आदी आवश्यक बाबी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे कृष्णप्रकाश यांनी सांगितले.




























































