रंगदेवता आणि नाटय़रसिकांना विनम्र अभिवादन करून… मुंबईत नाटक सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रविवारची दुपार… बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहाबाहेर प्रेक्षकांची लगबग… प्रत्येकाची आरोग्य तपासणी करून होणारी एंट्री… स्वागताला दारात हात जोडून उभे असलेले कलाकार… प्रत्यक्ष पडदा उघडताच झालेला टाळ्यांचा कडकडाट! गेल्या 10 महिन्यांचा विरह संपला. रंगदेवता आणि नाटय़रसिकांना विनम्र अभिवादन करून नाटक सुरू झालं… ‘पुनश्च हरिओम’ करताना ‘इशारों इशारों में’चा प्रयोग रंगला.

कोरोनामुळे नाटय़गृहे गेल्या नऊ महिन्यांपासून बंद होती. या काळात कलाकार, बॅकस्टेज आर्टिस्ट आणि निर्मात्यांचे मोठे नुकसान झाले. या सर्व अडचणींवर मात करून नाटक सुरू झालं. नाटय़गृहाच्या भाडय़ात 75 टक्के सवलत आणि नाटय़संस्थांच्या वाहनांना टोलमाफी असे निर्णय सरकारने घेतले. 12 डिसेंबर रोजी पुण्यात प्रशांत दामले यांच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ने व्यावसायिक नाटक सुरू झाले. मुंबईतील रिओपनिंगसाठी एक आठवडा वाट बघावी लागली. आज ‘इशारों इशारों में’ नाटकाच्या प्रयोगाने मुंबईतील नाटक अनलॉक झाले. यावेळी सागर कारंडे, उमेश जगताप, संजना हिंदुपूर, शशिकांत गंगावण या कलाकारांनी प्रेक्षकांचे स्वागत केले. या प्रयोगाला अनिता दाते, श्रेया बुगडे, गायत्री दातार, योगेश शिरसाट उपस्थित होते. प्रेक्षकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी नाटय़गृह व्यवस्थापन आणि महानगरपालिका यांनी चोख व्यवस्था केली होती. सॅनिटायझर स्टँड, ऑटोमेटिक टेम्परेचर चेकिंग मशीन सज्ज होती. ‘इशारों इशारों में’ नाटक हाऊसफुल झाल्याचे सहनिर्माता मंदार काणे यांनी सांगितले.