
मुंबई-पुणे तसेच महाराष्ट्रातून कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांसाठी राज्य सरकारने टोलमाफीची घोषणा केली. टोलमाफीसाठी पासेसही वितरण केले. मात्र, ही टोलमाफी केवळ कागदावरच असून गणेशभक्तांकडून ऑनलाईन टोलवसुली सुरूच आहे. यावरून गणेशभक्तांमध्ये, चाकरमान्यांन्यामध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे.
पुणे धानोरी येथून येणारे चाकरमानी मनोहर पवार यांना पुणे विश्रांतवाडी पोलीस चौकीमधून पथकर माफी (टोलमाफी)चा पास देण्यात आला. संबंधित अधिकाऱयाने या पासाची नोंद करून घेतली आणि पथकर माफीचा पास वितरित केला. टोलमाफीचा पास परवाना मिळवण्यासाठी कागदपत्रांची पडताळणीसुद्धा केली. कुठून कुठेपर्यंत प्रवास करणार याबाबतची माहिती या अधिकाऱयाने नोंदवून घेतली. पथकर माफीचा पास घेऊन त्यांनी पुण्याहून सावंतवाडी गाठली. सुरुवातीला त्यांना खेड शिवापुर टोलनाका मिळाला. त्यानंतर आणेवाडी टोलनाका मिळाला. त्यानंतर तिसरा टोलनाका तसवडे मिळाल्यानंतर ते अनुस्कुरा घाटातून कोकणात दाखल झाले.
टोलमाफीची घोषणा फसवी
मुंबई, पुणे तसेच अन्य भागांतून कोकणात येणाऱया चाकरमान्यांना राज्य सरकारने दिलेली माफी फसवी असल्याची बाब समोर आली असून गणेशभक्तांची वाहने टोलवरून गेल्यानंतर काही क्षणात त्यांच्या खात्यामधून टोलची रक्कम डेबिट झाल्याच्या घटना घडत आहेत. प्रसिद्धीसाठी राज्यकर्त्यांकडून गणेशभक्त चाकरमान्यांसाठी टोलमाफीची घोषणा केली जाते. मात्र प्रत्यक्षात चाकरमान्यांकडून टोलवसुली केली जात आहे.
अशी झाली टोलवसुली
टोलमाफी असल्यामुळे पवार कुटुंबासह गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल झाले. मात्र, सुरुवातीला मिळालेल्या खेड शिवापूर टोलनाक्याचे रुपये 125 त्यांच्या खात्यातून डेबिट झाले तसा मेसेज त्यांना आला. त्यानंतर दुसरा टोलनाका आनेवाडीचा टोलनाक्यामधून 85 रुपये डेबिट झाले आणि तिसरा टोल नाका तसवडे या टोलनाक्याचे 75 रुपये असे मिळून एकूण रुपये 285 त्यांच्या खात्यामधून डेबिट झाल्याचा मेसेज त्यांना आला.