गँगमनच्या सतर्कतेमुळे इंटरसिटी एक्सप्रेसचा अपघात टळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पिंपरी

दोन रुळांमध्ये पडलेले अंतर सतर्क गँगमनच्या वेळीच लक्षात आल्यामुळे मुंबईहून पुण्याकडे येणाऱया इंटरसिटी एक्सप्रेसचा अपघात टळला. हा प्रकार ठाकूरवाडी ते मंकी हिलच्या दरम्यान घडला.

मुंबई – पुणे इंटरसिटी एक्सप्रेस सकाळी पावणेसात काजता मुंबईतून छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून सुटते. सकाळी दहा वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचते. त्यामुळे पुणे-मुंबई दरम्यान प्रवास करणारे प्रवासी मोठय़ा संख्येने या रेल्वेला पसंती देतात. सुनील कुमार बिहारी मध्य रेल्वेमध्ये गँगमन म्हणून मंकी हिल येथे कार्यरत आहे. नेहमीप्रमाणे इंटरसिटी एक्सप्रेस ठाकूरवाडी ते मंकी हिल दरम्यान आली असता लोणावळ्याकडे जाणारा रेल्वे ट्रेक तुटला. दोन रुळांमध्ये सुमारे तीन ते चार इंचाचे अंतर पडले होते. ही गॅप गस्त घालून घरी जाणाऱ्या गँगमन सुनील कुमार बिहारी यांच्या लक्षात आली. याचवेळी या मार्गावरून इंटरसिटी एक्सप्रेस जात होती. प्रसंगावधान राखत बिहारी यांनी त्वरित चालकाला इशारा करून गाडी थांबविण्यास सांगितले. चालकाने वेळीच गाडी थांबविल्याने मोठा अपघात टळला. त्यानंतर थोडय़ाच वेळात रेल्वेच्या इंजिनीरिंग स्टाफने येऊन पाहणी करून तात्पुरती दुरुस्ती करून इंटरसिटी पुण्याकडे रवाना केली.