फ्लॅटफॉर्म तिकिटांतून रेल्वेने कमावले 139 कोटी

165

रेल्वे मंत्रालयाने उत्पन्नवाढीसाठी प्लॅटफॉर्म तिकिटांचा दर 1 एप्रिल 2015 पासून वाढविला होता. या प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीतून रेल्वेला 2018-19 या आर्थिक वर्षात तब्बल 139 कोटींची कमाई झाली. रेल्वेला प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीतून यंदाच्या आर्थिक वर्षात सप्टेंबर महिन्यापर्यंत 78.50 कोटींची कमाई झाल्याचे लोकसभेतील प्रश्नाला लेखी उत्तर देताना रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी म्हटले आहे.

रेल्वे मंत्रालयाने अर्थसंकल्प सादर करताना थेट तिकीट भाडेवाढ न करता 1 एप्रिल 2015 पासून प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे 5 रुपयांचे असलेले प्लॅटफॉर्म तिकीट 10 रुपयांना विकले जात आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना सोडण्यासाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असते. याचा त्रास इतर प्रवाशांना होत होता. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकीट दरवाढीचा निर्णय घेतला होता.

माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीतून गेल्या दहा वर्षांत भंगार विक्रीतून 35,073 कोटींची रेल्वेला कमाई झाली आहे. यात कोच, वॅगन आणि रेल्वे रुळांच्या भंगाराचा समावेश आहे. रेल्वे मंत्रालयाने गेल्या दहा वर्षांत सर्वांत जास्त कमाई  2011-12 या आर्थिक वर्षात 4,409 कोटींच्या उत्पन्नातून मिळाली तर सर्वांत कमी उत्पन्न 2016-17 या आर्थिक वर्षात 2,718 कोटी इतके मिळाले.

जाहिरातीतून बक्कळ कमाई

रेल्वे आणि फ्लॅटफॉर्मवरील जाहिरातींमधूनदेखील रेल्वे बक्कळ कमाई करीत आहे. 2018-19 या आर्थिक वर्षात स्थानकांवर जाहिराती तसेच दुकानांच्या मंजुरीमुळे 230.47 कोटींची कमाई झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या