मुंबईकडे येणाऱ्या विमानाला पक्ष्याची धडक, थोडक्यात टळला अपघात

1095

शुक्रवारी कोझिकोडे येथे झालेल्या विमान अपघाताने अवघा देश हादरला आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी होऊ घातलेला  एअर एशिया या विमानाचा अपघात सुदैवाने टळला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, रांचीहून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या एअर एशियाच्या i5-632 क्रमांकाच्या विमानाला पक्षी आदळला आहे. रांचीहून उड्डाण केल्यानंतर काहीच वेळात विमानाला पक्ष्याची धडक बसली. त्यामुळे ताबडतोब विमानाला पुन्हा जमिनीवर आणण्यात आलं. सुदैवाने त्यातील कोणत्याही प्रवासी अगर कर्मचाऱ्याला दुखापत झाली नाही. सध्या विमानाचं परीक्षण केलं जात आहे. संबंधित विभागाची मंजुरी मिळाल्यानंतरच या विमानाला उड्डाणाची परवानगी मिळेल.

ही घटना कोझिकोडे येथे घडलेल्या भीषण विमान अपघातानंतर दुसऱ्याच दिवशी घडली आहे. शुक्रवारी ‘वंदे भारत’ अभियानांतर्गत दुबईहून केरळ येथील कालिकत येथे येणारे एअर इंडियाचे विमान करिपूर विमानतळावर लॅण्डिंगवेळी घसरले आणि अक्षरश: दोन तुकडे झाले. विमानाचा एक तुकडा दरीत कोसळला आहे. विमानात 191 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. या भयंकर अपघातात किमान 17 प्रवाशांचा मृत्यू झाला.

एअर इंडियाची ही एक्स्प्रेस फ्लाईट होती. ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत दुबईहून प्रवासी केरळमध्ये परतत होते. रात्री 7.40 च्या सुमारास हा अपघात झाला. कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ हे कोझिकोडेनजीक आहे. या विमानतळाला करिपूर विमानतळ असेही म्हटले जाते. हे विमानतळ टेबलटॉपवर आहे. 10 क्रमांकाच्या धावपट्टीवर लॅण्डिंग होत असताना विमान घसरले. मुसळधार पावसामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घसरल्यानंतर विमानाचे अक्षरश: दोन तुकडे झाले आणि 50 फूट खोल दरीत कोसळले.

आपली प्रतिक्रिया द्या