मुंबईकरांसाठी 250 रस्त्यांचे काम प्रगतिपथावर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकरांसाठी पालिकेच्या विविध भागांत तब्बल 250 रस्त्यांची कामे प्रगतिपथावर असून रस्त्यांची पावसाळापूर्व कामेही वेळेत पूर्ण करणार असल्याचे स्पष्टीकरण आज पालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकीत केले. मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी  आवश्यक उपाययोजना करणार असल्याचेही यावेळी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईत रस्त्यांची ऑक्टोबरमध्ये सुरू होणारी अनेक कामे अद्याप सुरू झाली नसल्याचे सांगत ‘सपा’चे गटनेते रईस शेख यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. या हरकतीच्या मुद्दय़ाला शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी समर्थन दिले. पालिका प्रशासनाच्या दिरंगाईमुळेच रस्त्यांची कामे रखडल्याचे यावेळी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव म्हणाले. पालिका प्रशासन हलगर्जी कारभार करीत असल्यामुळे नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची वेळ नगरसेवकांवर येत असल्याचेही त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर पालिकेने रस्त्यांच्या कामांच्या सद्यस्थितीचा सविस्तर अहवाल सादर करावा आणि रस्त्यांची कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी असे निर्देशही यशवंत जाधव यांनी दिले. या हरकतीच्या मुद्दय़ाला विरोधी पक्षनेते रवी राजा, भाजपचे प्रभाकर शिंदे यांनीदेखील पाठिंबा देत पालिका प्रशासनाच्या अयोग्य धोरणामुळेच रस्त्यांची कामे रखडल्याचा आरोप केला.

…म्हणूनच ’60-40’ फॉर्म्युला

रस्ता तयार करण्याचे कंत्राट दिल्यानंतर  ‘डीएलपी’ (डिफेक्ट लायबिलेटी पिरीएड) म्हणजेच हमी कालावधीत रस्त्याच्या दुरुस्तीकडे-देखभाल करण्याकडे संबंधित कंत्राटदार दुर्लक्ष करतात. त्यामुळे रस्त्यांची दुर्दशा होते. हे टाळण्यासाठी ‘60ः40’ फॉर्म्युला तयार केला असल्याचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी सांगितले. यामध्ये रस्त्यांच्या कंत्राटाच्या एकूण रकमेपैकी फक्त 60 टक्के रक्कम देऊन 40 टक्के रक्कम रोखून धरली जाते. ही रक्कम रस्त्याच्या देखभालीसाठीचा तीन ते पाच-दहा वर्षांच्या हमी कालावधी संपल्यानंतर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जेणेकरून कंत्राटदार रस्ता तयार केल्यानंतर त्याची योग्य देखभाल करतील, असेही सिंघल यांनी स्पष्ट केले.