मुंबईत लवकरच मैल्यातून वीजनिर्मिती, 2464 दशलक्ष लिटर मलजलावर प्रक्रिया होणार; सात ठिकाणी प्रकल्पांचे काम प्रगतिपथावर

मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सात ठिकाणी मलजल प्रक्रियाकेंद्र (Sewage Treatment Plant) उभारण्यात येत आहेत. या सात प्रकल्पांद्वारे मिळून दररोज एकूण 2 हजार 464 दशलक्ष मलजलावर प्रक्रिया केली जाणार आहे. नवीन मलजल प्रक्रियाकेंद्रांमुळे समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता व सागरी जीवनामध्ये सुधारणा होणार आहे. या सातही मलजल प्रक्रियाकेंद्रांच्या उभारणीने आता वेग घेतला आहे. विशेष म्हणजे मलजल प्रक्रियाकेंद्रातून बाहेर पडणाऱया बायोगॅसपासून वीजनिर्मिती केली जाणार आहे.

मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मलनिस्सारण प्रकल्प विभागाने हाती घेतलेले मलजल प्रक्रियाकेंद्र उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. यात वरळीमध्ये 500 दशलक्ष लिटर, वांद्रे येथे 360 दशलक्ष लिटर, मालाडमध्ये 454 दशलक्ष लिटर, घाटकोपरमध्ये 337 दशलक्ष लिटर, धारावीमध्ये 418 दशलक्ष लिटर, भांडुपमध्ये 215 दशलक्ष लिटर आणि वर्सोवा येथे 180 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या 7केंद्र उभारणीची कार्यवाही वेगाने सुरू आहे.

बायोगॅसमधून वीजनिर्मिती करणार

मलजल प्रक्रियाकेंद्रातून बाहेर पडणाऱया बायोगॅसपासून वीजनिर्मिती केली जाणार आहे. तर बाहेर पडणाऱया गाळावर ‘अ’ दर्जाअंतर्गत प्रक्रिया करण्यात येणार आहे. मलजल प्रक्रियाकेंद्र प्रकल्पाची स्थापत्यविषयक प्रारंभिक कामे पूर्ण झाल्याने आता पुढील बांधकामाची स्थापत्य कामे वेगाने सुरु झाली आहेत. या प्रकल्प अंतर्गत प्राथमिक व दुय्यम प्रक्रियांसह तृतीय स्तरीय प्रक्रियाही केली जाणार असल्याची माहिती उप प्रमुख अभियंता (मुंबई मलनिस्सारण प्रकल्प) अशोक मेंगडे यांनी दिली.