शिवभोजन योजनेच्या फिरत्या उपाहारगृहासाठी ‘बेस्ट’च्या दोन गाड्या

645

राज्य सरकारने शिवभोजन योजनेला मंजुरी दिली असून 26 जानेवारीपासून ही योजना मोठ्या प्रमाणात राबवली जाणार आहे. या योजनेसाठी राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या फिरत्या उपाहारगृहासाठी ‘बेस्ट’ प्रशासन दोन गाडय़ा देणार आहे.

राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून शिवभोजन योजना राबविण्यात येणार आहे. यामध्ये दहा रुपयांत थाळी मिळणार आहे. त्यामुळे मुंबईत या योजनेसाठी फिरत्या उपाहारगृहासाठी ‘बेस्ट’ने दोन बस गाडय़ा देण्याची मागणी अन्न व नागरी पुरवठा विभागाने ‘बेस्ट’कडे केली आहे. यानुसार टाटा बनावटीच्या बस गाडी क्र.5083 एमएच 01 एलए 6232 व 5108 एमएच 01एलए 6256 या दोन सीएनजी बस गाड्या फिरत्या उपाहारगृहासाठी देण्यात येणार आहेत. या फिरत्या उपाहारगृहासाठी दिल्या जाणाऱया गाडय़ांचे आयुर्मान 3 वर्षे आहे. या बस गाडय़ांचे फिरत्या उपाहारगृहामध्ये रूपांतर करण्यासाठी 4.30 लाख एवढा खर्च आहे तर देखभाल, इंधन व चालक यांच्यावरील खर्चाची मागणी शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे ‘बेस्ट’ करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव आगामी बैठकीत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या