
सामना प्रतिनिधी। मुंबई
ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांनी सोमवारी आपला अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक अधिकाऱयांकडे सादर केला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना उपनेते अनंत तरे, नगरसेविका नंदिनी विचारे, लतिशा विचारे, धनश्री विचारे आदी उपस्थित होते. अर्ज दाखल करण्यापूर्वी तलावपाली ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान भव्य रॅली काढण्यात आली. त्यात शिवसेना नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार नरेंद्र मेहता यांच्यासह महायुतीचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी सोमवारी आपला अर्ज उपविभागीय कार्यालयात निवडणूक अधिकाऱयांकडे सादर केला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे, ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, आमदार रूपेश म्हात्रे, श्रमजिवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित आदी उपस्थित होते. अर्ज दाखल करण्यापूर्वी वंजारपट्टी येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयापासून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह महायुतीचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.


























































