स्पार्टन ‘मुंबई श्री’चे पोझयुद्ध आजपासून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्या ‘मुंबई श्री’ची वाट अवघे शरीरसौष्ठव जगत गेले तीन वर्षे पाहत होते, ती प्रतीक्षा आता संपली आहे. खरोखरच मुंबईकरांचा आणि मराठमोळय़ा युवकांचा-युवतींचा उत्साह वाढवेल, अभिमानाने छाती फुगवेल असे क्षण दोन दिवस रंगणाऱया स्पार्टन मुंबई श्रीच्या निमित्ताने अनुभवयाला मिळणार आहेत. भारतीय शरीरसौष्ठवात सर्वाधिक मानाची आणि प्रतिष्ठsच्या असलेल्या ‘मुंबई श्री’ स्पर्धेत मुख्य शरीरसौष्ठव स्पर्धा, महिलांची शरीरसौष्ठव स्पर्धा आणि फिजिक स्पोर्टस्च्या दोन गटांतील पोझयुद्धाची प्राथमिक चाचणी उद्या शुक्रवारी शहाजी राजे क्रीडा संकुलात रंगणार असून यात प्राथमिक पोझयुद्धासाठी 300 पेक्षा अधिक खेळाडू प्रत्यक्ष मैदानात उतरतील. स्पर्धेची वजन तपासणी सकाळी 9 वाजल्यापासून सुरू होईल, तर सायंकाळी  प्राथमिक फेरीचा थरार रंगेल.

स्पार्टन न्यूट्रिशन्सने मुंबई श्रीला मुख्य पुरस्काराचे बळ दिलेय, पण शरीरसौष्ठवावर प्रेम करणारे अनेक क्रीडाप्रेमी आणि संघटकही मुंबई श्रीसाठी पुढे सरसावले आहेत. व्यायाममहर्षी मधुकर तळवलकर यांनी विजेत्याला सवा लाखाचे इनाम देणार असल्याचे जाहीर केले आहे, तर स्पर्धेतील इतर रोख पुरस्कार आणि चषकांसाठी अमोल कीर्तिकर, सिद्धेश कदम, अॅड. विक्रम रोठे आणि विजय झगडे या संघटकांनी आर्थिक हातभार लावला आहे. त्याचप्रमाणे क्रीडाप्रेमी सुबोध मेनन यांनीही नेहमीप्रमाणे शरीरसौष्ठवावर आपले प्रेम दाखवले आहे.