बनावट आर.सी. स्मार्टकार्ड बनवून देणाऱ्या टोळीचे दोघे गजाआड

crime

राज्य सरकार व नागरिकांना पद्धतशीर चुना लावणाऱया एका टोळीतील दोघा भामटय़ांच्या मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-12ने गठडय़ा वळल्या. आरोपी मागणीनुसार विविध प्रादेशिक परिवहन विभागांच्या कार्यालयांचे बनावट आर.सी. स्मार्ट कार्ड बनवून देत होते.

काही इसम वापरातून बाद झालेले जुने स्मार्ट कार्ड विकत घेऊन मग त्यावरील मजकूर केमिकलच्या सहाय्याने पुसल्यानंतर त्या कार्डवर स्क्रिन प्रिंटींगद्वारे मागणीनुसार समोरच्याला पाहिजे त्या आरटीओ कार्यालयाचे बनावट आर.सी.स्मार्ट कार्ड बनवून देत असल्याची खबर युनिट-12 चे पोलीस निरीक्षक सचिन गवस यांना मिळाली. त्यानुसार उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक महेश तावडे, गवस तसेच एपीआय अतुल आव्हाड, प्रकाश सावंत, अंमलदार मंगेश तावडे, संतोष बने या पथकाने त्या टोळीचा शोध सुरू केला. तेव्हा त्या टोळीचा एक भामटा दहिसर रेल्वे स्थानकाबाहेर येणार असल्याची माहिती मिळताच तेथे सापळा रचून एकाला अटक केली.त्यानंतर कोऱया स्मार्टकार्डवर वाहन धारकांची माहिती स्क्रिन प्रिंटींग करून देणाऱया दुसऱया आरोपीलादेखील बेडय़ा ठोकल्या. जयेश मेहता (50) आणि अविनाश बोरकर (40) अशी त्या भामटय़ांची नावे आहेत.

अटक आरोपींकडून 18 बनावट आर.सी. स्मार्टकार्ड, स्क्रिन प्रिंटरचे साहित्य, मोबाईल आदि साहित्य हस्तगत केले आहेत. अशाप्रकारे बनावट दस्ताऐवज बनविल्याप्रकरणी अटक आरोपींविरोधात टिळकनगर, भांडुप तसेच समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आरोपींचे आणखी साथीदार कोण आहेत. त्यांनी आतापर्यंत असे किती बनावट आर.सी. स्मार्टकार्ड बनवून विकले याचा पोलीस शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या