
भीमा-कोरेगाव हिंसाचार तसेच एल्गार परिषदप्रकरणी अटक करण्यात आलेले सामाजिक कार्यकर्ते, फादर स्टॅन स्वामी (84) यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज दुपारी मृत्यू झाला. त्यांच्यावर वांद्रे येथील होली फॅमिली रुग्णालयात 28 मेपासून उपचार सुरू होते. स्टॅन स्वामी यांना पार्किन्सन्स, न्यूमोनियाचा आजार होता. तसेच त्यांना कोरोनाचीही लागण झाली होती. त्यांच्या मृत्यूची माहिती रुग्णालयाच्या संचालकांनी खंडपीठाला दिल्यानंतर आजच्या आज शवविच्छेदनाची व्यवस्था करावी, असे आदेश न्यायमूर्तींनी राज्य सरकारला दिले.
स्टॅन स्वामी यांना एनआयएने गेल्या वर्षी अटक केली होती. अटक करण्यात आल्यानंतर 84 वर्षीय स्टॅन स्वामी यांची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली. स्वामी यांनी आजारपणाच्या मुद्दय़ावर विशेष एनआयए कोर्टात सुटकेसाठीचा अर्ज केला. मात्र सत्र न्यायालयाने तो फेटाळून लावला. त्यामुळे स्वामी यांनी उच्च न्यायालयात अपील केले. प्रकृती गंभीर असल्याने स्टॅन स्वामींना वांद्रे येथील होली फॅमिली या खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने तळोजा कारागृह प्रशासनाला दिले होते. तेथे उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती रुग्णालयाचे संचालक डॉ. इयान डिसूझा यांनी न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाला दिली.
फादर स्टॅन स्वामी यांना कुटुंब नसल्याने सेंट झेवियर्स महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य फादर फ्रेझर मस्कारेन्हास यांच्याकडे त्यांचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी देण्यात यावा, अशी विनंती अॅड. देसाई यांनी खंडपीठाला केली. खंडपीठाने ही विनंती मान्य करत राज्य सरकारने शवविच्छेदनाची आजच व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या. त्याचबरोबर स्वामींवर सुरू असलेल्या उपचारांबाबतचे सर्व वैद्यकीय अहवाल तळोजा कारागृह प्रशासनाने न्यायालयात सादर करावेत, असेही आदेश देत सुनावणी मंगळवारपर्यंत तहकूब केली.

























































