राज्यातील पहिले सोलर पार्क धुळय़ात

37

सामना प्रतिनिधी। मुंबई

राज्यातील पहिले सोलर पार्क उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. धुळे जिह्यातील दोंडाईचा येथे तब्बल 500 मेगावॅटचा सोलर उभारण्याचा निर्णय महानिर्मितीने दोन वर्षांपूर्वी घेतला होता. या मोठय़ा सोलर पार्कची उभारणी कोणाकडून व कशी करावी असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्या पार्श्वभूमीवर सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने मागवलेल्या निविदांमध्ये तलेतुत्तयी पॉवरसह तीन कंपन्यांनी टेंडर भरले असून त्यांनी येथे तयार होणाऱया प्रतियुनिट विजेचा दर सरासरी 2 रुपये 90 पैसे भरला आहे. त्यामुळे दिरंगाईच्या फेऱयात अडकलेल्या सोलर पार्कला चालना मिळणार आहे.

कोळशावरील वीज प्रकल्पांमुळे होणारे प्रदूषण, अपुरा कोळसा आणि पाणीटंचाईमुळे वीजनिर्मितीवर मर्यादा येत आहेत. त्याची दखल घेत राज्य सरकारने सुमारे सात हजार मेगावॅटचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत महानिर्मिती सुमारे दीड हजार एकर जागेवर 500 मेगावॅटचे सोलर पार्क उभारणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 250 मेगावॅटचा फोटोव्होल्टेक तंत्रज्ञानावर अधारित 250 मेगावॅटसाठी सोलर एनर्जी कॉर्पोरेशनने निविदा मागवल्या होत्या. त्यानुसार तलेतत्तया पॉवरने 50 मेगावॅटसाठी सर्वात कमी म्हणजे प्रतियुनिट 2 रुपये 87 पैसे दर दिला आहे. त्याखालोखाल टाटा पॉवरने 100 मेगावॅटसाठी 2 रुपये 88 पैसे आणि एनटीपीसीने 100 मेगावॅटसाठी 2 रुपये 91 पैसे एवढा दर दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोलर पार्क कोणी आणि कसे उभारायचे हा प्रलंबित प्रश्न निकाली निघाला आहे.

राजस्थानात सर्वात कमी दर
सोलर एनर्जी कॉर्पोरेशनने महाराष्ट्राबरोबरच राजस्थान आणि गुजरातमध्येही मोठय़ा क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी टेंडर मागवले होते. त्यानुसार राजस्थानमध्ये 750 मेगावॅटचा सौर प्रकल्प उभारण्यासाठी प्रतियुनिटचा दर केवळ 2 रुपये 48 पैसे एवढा दिला आहे. तर गुजरातमध्ये 250 मेगावॅटसाठी 2 रुपये 75 पैसे एवढा प्रतियुनिटचा दर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या