जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सरकारी अधिकाऱ्यांनीच मारली दांडी, आमदारांनी विचारला जाब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-suburban-planning-committee-meeting-officials-absent-mlas-angry

मुंबईच्या उपनगरातील प्रकल्प मार्गी लावण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करण्यासह विकास निधीच्या संदर्भात आज आयोजित केलेल्य मुंबई उपनगर जिह्याच्या नियोजन समितीच्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला शासकीय अधिकाऱ्यांनीच दांडी मारली. त्यामुळे संतप्त झालेल्या आमदारांनी जाब विचारला. मुख्य म्हणजे, जिल्हा नियोजन समितीच्या बैठका आता दर दोन महिन्यांनी होण्याची चिन्हे आहेत.

मुंबई जिल्हा उपनगर नियोजन समितीची बैठक वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. मुंबई उपनगर जिह्याचे पालकमंत्री आशीष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीला सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा व अन्य उपस्थित होते.

वाहतूककोंडीचे पडसाद

मुंबईतील वाहतूककोंडीचे आणि कार पार्ंकगचे पडसाद या बैठकीत उमटले. मुंबई पालिकेच्या कोणत्या वाहनतळावर पार्ंकगसाठी किती जागा उपलब्ध आहे याची माहिती मिळण्यासाठी ऍप कधी येणार आणि पार्ंकग धोरण कधी येणार, अशी विचारणा शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी केली.

वांद्रे-दहिसर दोन तास अंतर

कोस्टल रोडवरून वांद्रे भागात आल्यावर पुढे गोरेगाव, दहिसरला जाण्यासाठी दोन तासांचा कालावधी लागतो. ही वाहतूककोंडी कधी फुटणार, कोस्टल रोड हा दिंडोशीला उतरणार आहे. त्यासाठी काय नियोजन करणार, असा सवाल सुनील प्रभू यांनी केला.

विमानतळाशेजारील रहिवाशांना घरे कधी?

मुंबई विमानतळाच्या शेजारील झोपडपट्टीधारकांना सुरक्षित जागी स्थलांतरित करण्यासाठी मी गेल्या 14 वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे. 3 हजार 232 झोपडपट्टीधारक पात्रही झाले आहेत, पण त्यांना पर्यायी घरे अद्याप दिलेली नाहीत, ती कधी देणार असा सवाल शिवसेना आमदार संजय पोतनीस यांनी केला.

आम्ही खुर्चीवर बसायला आणि चहा प्यायला आलो का?

या बैठकीला म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल, पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त अनुपस्थित होते. यावरून सर्वच पक्षांचे आमदार नाराज झाले. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी आम्ही काय या बैठकीला नुसते खुर्चीवर बसायला आलो आहोत का, असा संतप्त सवाल विचारला. तर सुनील प्रभू आम्ही काय चहा पिण्यासाठी येतो का, अशा शब्दांत जाब विचारला. यावेळी शिवसेना आमदार अनिल परब, वरुण सरदेसाई, बाळा नर उपस्थित होते.