तलवारबाजीला हवाय मदतीचा हात! मुंबईचा युवा खेळाडू जय खंडेलवालचे मत

181

तलवारबाजी हा खेळ हिंदुस्थानात प्रसिद्ध नाही. या खेळाला लागणारी उपकरणेही लाखो रुपयांना मिळतात. हा खेळ शिकण्यासाठी ज्या ऍकॅडमीत जावे लागते तेथेही पैसा लागतो. त्यामुळे होतकरू अन् गरीब युवकांची पावलेही या खेळाकडे वळत नाहीत. खेळाचा प्रसार, प्रचार नाही. अत्याधुनिक सुविधांचाही अभाव. स्पॉन्सर्सचाही पुढाकार नाही. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील बोरिवली येथे वास्तव्य करणाऱया 18 वर्षीय जय खंडेलवाल या तलवारबाज खेळाडूशी दैनिक ‘सामना’ने संपर्क साधला. यावेळी तो म्हणाला, तलवारबाजीला सर्व स्तरांतून मदतीचा हात मिळायला हवा. आपल्या देशात गुणवत्तेची कमी नाही, पण सरकार, डीएसओ, कॉर्पोरेट सेक्टर, इतर स्पॉन्सर्सनी पुढाकार घेतल्यास हा खेळही नक्कीच पुढे जाईल, असे तो आत्मविश्वासाने म्हणाला.

केदार सरांमुळे कायापालट झाला

माझ्या आईला मी क्रीडापटू व्हावे असे मनापासून वाटत होते. एका नातेवाईकाकडून तलवारबाजीबाबत सांगण्यात आले. त्यानंतर ‘फेन्सर्स स्पोर्टस् फाऊंडेशन’ या ऍकॅडमीत दाखल झालो. सुरुवातीला त्यामध्ये मन रमत नव्हते तसेच प्रत्येक स्पर्धेत पराभूत होत होतो, पण केदार ढवळे सरांच्या मोलाच्या टिप्समुळे कायापालट झाला. आधी मी उजव्या हाताने तलवारबाजी करीत होतो, पण केदार ढवळे सरांच्या निरीक्षणानंतर मी डाव्या हाताने खेळू लागलो. तिथपासून प्रत्येक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करता आली, असे जय खंडेलवाल पुढे स्पष्टपणे सांगतो.

उपकरणासाठी लाखांचा खर्च

तलवारबाजीसाठी लागणाऱया उपकरणासाठी एकूण सात ते आठ लाख रुपयांचा खर्च करावा लागतो. यामध्ये जॅकेट, इलेक्ट्रॉनिक जॅकेट, मास्क, ब्रिचेस, स्पेशल शूज व मोजे, ग्लोव्हज्, टीव्ही, वायर, मॅट यांसह आणखी छोटय़ा मोठय़ा गोष्टींचा समावेश आहे. ऑल स्टार, लेयॉन पॉल, पीबीटी आणि ऍब्सलूट फेन्सिंग या कंपन्यांद्वारे तलवारबाजीची उपकरणे उपलब्ध होतात. हिंदुस्थानात चिनी कंपन्यांद्वारे 12 ते 22 हजारांपर्यंतही ही उपकरणे मिळतात. अर्थात आंतरराष्ट्रीय स्तरावर अव्वल दर्जाचीच उपकरणे वापरावी लागतात, असे जय खंडेलवाल म्हणाला.

तीन प्रकारांत खेळ रंगतो

तलवारबाजी हा खेळ तीन प्रकारांत रंगतो. फॉईल, इप्पी व सेबर या तीन प्रकारांत खेळाडू पदक मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतात. फॉईल प्रकारात मानेपासून ते कमरेपर्यंतच्या भागावर (नॉर्मल जॅकेटवर इलेक्ट्रॉनिक जॅकेट परिधान केलेला भाग) तलवारीने स्पर्श केल्यास खेळाडूंना गुण दिले जातात. इप्पी प्रकारात पूर्ण शरीरावर तलवारीचा स्पर्श झाल्यास गुण मिळतात. सेबर प्रकारात मास्क व फुल साईज टी शर्ट असलेल्या भागांपर्यंत स्पर्श केल्यास त्यांना गुण मिळतात, असे जय खंडेलवाल यावेळी आवर्जून सांगतो.

शालेय स्तरावर या खेळाची सुरुवात व्हायला हवी

तलवारबाजी या खेळामुळे व्यक्ती हुशार होते. या खेळामुळे समर्पण, शिस्त लागते. या खेळामुळे आता आर्मी, रेल्वे, नेव्ही यांसारख्या ठिकाणी खेळाडूंना नोकऱया मिळू लागल्या आहेत. त्यामुळे आपल्या देशात शालेय स्तरापासूनच या खेळाची सुरुवात व्हायला हवी. त्यामुळे युवकांना या खेळाची गोडी लागेल, पण काही शाळा या खेळाचा समावेश करीत नाहीत. तलवारबाजीचे देशातील भविष्य उज्ज्वल होण्यासाठी शालेय स्तरावर या खेळाचा समावेश व्हायलाच हवा, असे जय खंडेलवाल नमूद करतो.

अमेरिकेत जाऊन प्रशिक्षण घेणार

मी रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल ऍण्ड ज्युनियर कॉलेजमधून दहावीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मिठीबाई कॉलेजमधून अकरावीचे शिक्षण पूर्ण केले. मात्र 12वीला पुन्हा रुस्तमजी कॉलेजमध्ये प्रवेश केला. कारण मिठीबाई कॉलेजमध्ये खेळ व अभ्यास यांची योग्य सांगड घालता येत नव्हती. दहावीला 97 तर बारावीला 80 टक्क्यांसह उत्तीर्ण झालो. आता तलवारबाजीच्या पुढच्या प्रशिक्षणासाठी अमेरिकेत जाणार आहे. तिथेच मायक्रोबायोलॉजीचेही शिक्षण घेईन, असे जय खंडेलवाल याने आवर्जून म्हटले.

अजून मोठी झेप घ्यायचीय

तलवारबाजी या खेळाचा काही वर्षांपूर्वी म्हणावा तसा प्रसार झाला नव्हता. पण आता मुंबई, महाराष्ट्रासह देशामध्ये या खेळाच्या स्थितीत सुधारणा होताना दिसत आहे. मुंबईत अनेक ऍकॅडमी आहेत, जिथे खेळाडू प्रशिक्षण घेताना दिसताहेत. मात्र अमेरिका, चीन, कोरिया, जपान, इटली, फ्रान्स, हंगेरी, जर्मनी हे देश तलवारबाजीत प्रचंड पुढे आहेत. त्यांच्या तुलनेत आपण मागे आहोत. मोठी झेप घ्यावी लागणार आहे. भवानी देवीमुळे आता देशात तलवारबाजीकडे युवकांची पावले वळू लागल्यास आश्चर्य वाटायला नको. भवानी देवी टोकियो ऑलिम्पिक खेळण्याच्या उंबरठय़ावर उभी आहे, असे जय खंडेलवाल यावेळी भावुकपणे सांगतो.

आपली प्रतिक्रिया द्या