
गेल्याच आठवडय़ात पावसाळी वातावरणातील दमट हवामानाने हैराण झालेल्या मुंबईकरांना आता पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार आहे. यामध्ये मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील बहुतांशी भागात पारा 40 अंशांवर जाण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे उकाडा प्रचंड वाढणार असल्याने घराबाहेर पडत असाल तर काळजी घ्या आणि तब्येत सांभाळा, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
मुंबईत वाढलेल्या हवा प्रदूषणामुळे नागरिकांमध्ये आधीच श्वसनाचे आजार वाढले आहेत. यातच आता प्रत्येक आठवडय़ात बदलत असणाऱया वातावणामुळे मुंबईकर हैराण आहेत. आता तर तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईत शनिवारीही चांगलाच उकाडा होता. अनेक ठिकाणी पारा 36 ते 38 अंशांपर्यंत गेल्याने मुंबईकरांना उकाडय़ाचा त्रास सहन करावा लागला.
राज्यात या ठिकाणी पारा चढणार
मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर
विदर्भ, मराठवाडय़ात अवकाळी पाऊस
एकीकडे उष्णतेचा पारा वाढत असताना विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी अवकाळी पाऊस होण्याची शक्यताही हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. यामध्ये धाराशीव, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार, परभणी, छत्रपती संभाजीनगर भागात पावसाची शक्यता आहे. तर 15 ते 16 मार्चदरम्यान नागपूर, सातारा, लातूर, गोंदिया, सांगली, बुलढाण्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे.
अशी घ्या काळजी
z प्रखर उन्हात घराबाहेर पडू नका
z सुती कपडे, टोपी, छत्रीचा वापर करा
z तेलकट, पचण्यास जड पदार्थ खाणे टाळा
z पुरेसे पाणी, सरबत, नारळपाणी प्या



























































