मुंबई, ठाण्यातील तबेले डहाणूत हलविण्याची अंमलबजावणी करा,हायकोर्टाचे आदेश

486

शहरातील तबेल्यांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेची दखल घेत हायकोर्टाने मुंबई, ठाण्यासह नऊ पालिका हद्दीतील तबेले डहाणूतील दापचरी येथे हलविण्याची अंमलबजावणी करा असे आदेश दुग्धविकास विभागाला दिले. त्याचबरोबर या तबेल्यांना पायाभूत सुविधा पुरावा अशा सूचनाही हायकोर्टाने राज्य सरकारला केल्या.

मुंबई आणि आसपासच्या परिसरातील जवळपास 36 हजार गुरांच्या तबेल्यांमुळे प्रदूषणाचा तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे असा आरोप करत जनहित मंच या संस्थेने 2005 साली मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेची दखल घेत हायकोर्टाने ज्येष्ठ ऍड. विवेक शिराळकर यांची ‘न्यायालयीन मित्र’ (अमायकस क्युरी) म्हणून निवड केली असून एक समितीही गठीत करण्याचे आदेश दिले होते. त्याचबरोबर या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी समिती आणि तबेले मालक संघटनांनी मंत्रालयात बैठक घेण्याच्या सूचना खंडपीठाने गेल्या सुनावणीवेळी केली होती. आज याप्रकरणी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी समितीने विविध शिफारसी खंडपीठासमोर सादर केल्या. या शिफारशींवर याचिकाकर्त्यांनी सहमती दर्शवली. तसेच या शिफारशी राज्य सरकारने मान्य केल्याचे कोर्टाला सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या