कांदिवलीत मंदिरातील आगीत तिघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कांदिवलीतील पश्चिम चारकोप परिसरातील साईबाबा मंदिरात शनिवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत तिघा जणांचा मृत्यू झाला. आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज असून पोलीस आणि अग्निशमन दल याची चौकशी करत आहे.

कांदिवली पश्चिम चारकोप, बंदरपाखाडी रोड, गुरव जमुना इमारतीच्या समोर असलेल्या साईबाबा मंदिरात शनिवारी मध्यरात्री 3.30 च्या सुमाराला भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग काही वेळात वाऱयासारखी पसरली. त्यामुळे मंदिरात झोपलेल्यांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. या घटनेत तिघे जण होरपळले. त्यांना कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, यातील सुभाष खोडे (25), युवराज पवार (25) या तरुणांचा दाखल होण्याआधीच मृत्यू झाल्याची माहिती सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वायपुळे यांनी दिली. दरम्यान, या घटनेत 95 टक्के भाजलेल्या मन्नू गुप्ता (26) या तरुणाला शीव रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, आज दुपारी दीड वाजता त्याचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.