
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाला लागून असलेल्या दहा एकर जागेवर पालिका एक्झॉटिक झू उभारणार असून जिराफ, झेब्रा, गोरीला अशा परदेशी पाहुण्यांचा संचार पर्यटकांना जवळून पाहायला मिळणार आहे. दक्षिण कोरियातून आणलेल्या पेंग्विनने पर्यटकांची मने जिंकली आहेतच, पण त्यामुळे पालिकेच्या महसुलातही मोठी वाढ केली आहे. त्यामुळे उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाला लागूनच एक्झॉटिक झू उभारून पर्यटकांना आणखी एक आकर्षणाचे केंद्र उपलब्ध देण्याचा पालिकेचा विचार आहे.
मुंबईसह देशविदेशातील पर्यटक शहरात आले की, मोठय़ा उत्साहाने भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाला भेट देतात. शनिवार-रविवार व सुट्टीच्या दिवशी उद्यान व प्राणिसंग्रहालयात पर्यटकांची मोठी गर्दी होते. गेल्या वर्षभरात पर्यटकांनी उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाला भेट देत मुंबईतील सर्वाधिक पसंतीचे पर्यटनस्थळ असल्याचे दाखवून दिले आहे. त्यात उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या आधुनिकीकरणाचे काम गेल्या काही वर्षांपासून झपाट्याने सुरू आहे.
उद्यानाच्या बाजूला असलेल्या मफतलाल संस्थेच्या दहा एकर भूखंडाची मालकी आता पालिकेकडे आली असून या ठिकाणी जिराफ, झेब्रा, गोरीला अशा परदेशी पाहुण्यांचा समावेश असलेले एक्झॉटिक झू उभारण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या केंद्र सरकारकडून मिळाल्या आहेत. सुरुवातीला प्राणी आणि पक्ष्यांसाठी अधिवास उभारले जाईल आणि त्यानंतर हे झू उभारले जाईल, मात्र त्यासाठी अंदाजे अडीच ते तीन वर्षे लागतील. – डॉ. संजय त्रिपाठी, संचालक, वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती आणि प्राणिसंग्रहालय
पेंग्विनने मने जिंकली; महसूल वाढवला
दक्षिण कोरियातून 2016 साली आणलेल्या पेंग्विनमुळे पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. पेग्विनसाठी विशेष कक्ष तयार करण्यात आला असून पालिकेकडून त्यांची योग्य ती काळजी घेतली जात आहे. पेंग्विन्सच्या गमतीजमतीने पाहणाऱयांची मने जिंकली असून त्यांना पाहण्याचा मोह मुलांसह मोठ्यांनाही होतो आहे. पेंग्विनमुळे पालिकेच्या महसुलातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पेंग्विनला मिळतोय तसा प्रतिसाद इतर प्राणी-पक्ष्यांनाही मिळेल, असा विचार करत एक्झॉटिक झू उभारण्याचा विचार पालिकेकडून सुरू आहे.
नवे मत्स्यालय, सर्पालय
उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात नवे मत्स्यालय आणि सर्पालयही उभारण्यात येणार आहे. जुन्या सर्पालयाचे नूतनीकरण करून 500 चौरस फूट जागेत सुसज्ज असे सर्पालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेला कलेक्शन आणि ले आऊट प्लॅनसह सर्व बाबींना परवानगी मिळाली आहे तर 5 हजार चौरस फूट जागेवर मत्स्यालय उभारण्यात येणार आहे, मात्र पेंद्र सरकारच्या पेंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडून याला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही.