चर्चगेट येथील मुंबई विद्यापीठाच्या जगन्नाथ शंकरशेट वसतिगृहातील गटारे गेल्या काही दिवसांपासून तुंबली आहे. त्यामुळे वसतिगृहाच्या परिसरात दुर्गंधी पसरली असून अनेक विद्यार्थी आजारी पडले आहेत. याची दखल घेत युवा सेनेने आज विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरले. प्रशासनाने त्यावर तात्पुरती सफाई केली असून कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा युवा सेनेने दिला आहे.
वसतिगृहातील विद्यार्थ्यानी वसतिगृह प्रमुखांकडे यासंदर्भात तक्रारी केल्या होत्या, परंतु त्याची काहीच दखल न घेतली गेल्याने विद्यार्थ्यानी शिवसेना नेते,युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केली. त्यांच्या सूचनेवरून युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी वसतिगृहाचा आढावा घेऊन पाहणी केली.
सदर गटार लाईन तातडीने दुरुस्ती करून घ्यावी आणि विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी युवा सेनेने केली. विनापरवानगी आंदोलन केल्यास कारवाई करण्याची कितीही फर्माने विद्यापीठाने काढली तरी विद्यार्ध्यांच्या आरोग्याचा विचार करून युवा सेना याप्रश्नी कोणत्याही कारवाईला न जुमानता तीव्र आंदोलन करेल, असा इशारा युवा सेनेने दिला आहे.