मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या मुंबई विद्यापीठ पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणुकीला मुहूर्त मिळाला आहे. ही निवडणूक आता 22 सप्टेंबरला होणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या एकूण दहा सिनेट सदस्यांच्या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. त्यामध्ये पाच जागा या खुल्या प्रवर्गासाठी तर उर्वरित पाच जागा या एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहेत.
मतदार यादीच्या घोळात अडकलेली ही निवडणूक आधी 21 एप्रिलला होणार होती. मात्र मतदार नोंदणीच्या यादीवर आक्षेप घेतल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते. त्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. आता या निवडणुकीचे सविस्तर वेळापत्रक मुंबई विद्यापीठाने परिपत्रक काढून जाहीर केले आहे.
6 ऑगस्टपासून या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. अर्ज स्वीकारण्याची मुदत 12 ऑगस्टपर्यंत तर 26 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.
22 सप्टेंबरला सकाळी नऊ ते सायंकाळी पाचच्या दरम्यान मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे तर 25 सप्टेंबरला मतमोजणीला सुरुवात होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे.