
युवासेनेच्या आक्रमक भूमिकेनंतर कांदिवली पश्चिमेकडील बालभारती मगनलाल जे. पंचोलिया महाविद्यालयाला गुरुवारी मुंबई विद्यापीठाने दणका दिला. महाविद्यालयाच्या दर्शनी भागात प्रवेशद्वारावर गुजराती भाषेतील नाव हटवून तेथे तत्काळ मराठी भाषेतील नाव लावण्यात यावे, असे सक्त आदेश विद्यापीठाच्या महाविद्यालय संलग्नता आणि विकास विभागाने बालभारती महाविद्यालयाला दिले.
सर्व महाविद्यालयांची नावे ठळक अक्षरांत दर्शनी भागातील प्रवेशद्वारावर लावण्याचे आदेश मुंबई विद्यापीठाने यापूर्वीच दिलेले आहेत. तसेच 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिवस विविध चर्चासत्रे आणि कार्यक्रम घेऊन साजरा करण्याचेही आदेश चार वर्षांपूर्वी देण्यात आले होते. तसे परिपत्रकच तत्कालीन पुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी जारी केले होते. तथापि, कांदिवली पश्चिम येथील बालभारती मगनलाल जे. पंचोलिया महाविद्यालयाने विद्यापीठाच्या त्या आदेशांना हरताळ फासला. ही गंभीर बाब निदर्शनास येताच युवासेनेने बुधवारी आक्रमक भूमिका घेतली आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेवरून युवासेनेच्या शिष्टमंडळाने मुंबई विद्यापीठाचे प्र-पुलगुरू डॉ. अजय भामरे, पुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांची भेट घेतली. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर मराठी भाषेत ठळक नाव लिहिण्याबाबत आदेश देण्यासंदर्भात विद्यापीठाला निवेदन देण्यात आले. युवासेनेच्या निवेदनाची विद्यापीठ प्रशासनाने गंभीर दखल घेतली आणि 24 तासांच्या आत बालभारती महाविद्यालयाला सक्त आदेश जारी केले.
…अन्यथा दंडात्मक कारवाई करणार
महाविद्यालयाचे नाव मराठी भाषेत दर्शनी भागातील प्रवेशद्वारावर तत्काळ लावण्यात यावे, अन्यथा महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 अंतर्गत महाविद्यालयावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महाविद्यालय संलग्नता व विकास विभागाने दिला आहे. बालभारती महाविद्यालयाने मायमराठीला डावलण्याचा प्रकार केला होता. युवासेनेने आक्रमक भूमिका घेऊन विद्यापीठाला महाविद्यालयाविरोधात कारवाईचे आदेश देण्यास भाग पाडल्याने मराठी भाषाप्रेमींकडून समाधान व्यक्त होत आहे.



























































