
मुंबई विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली असून फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की)कडून विद्यापीठाला ‘एक्सलेन्स इन ग्लोबलायझेशन’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यामुळे विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
फिक्कीद्वारे प्रदान करण्यात आलेला सर्वोत्कृष्ट उच्च शैक्षणिक संस्थेचा पुरस्कार सोहळा आज नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मुंबई विद्यापीठास हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि संशोधन व विकास कक्षाचे संचालक प्रा. फारुक काझी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. फिक्की ही 1927 साली स्थापन झालेली देशातील सर्वोच्च औद्योगिक संघटना असून ती शिक्षण, उद्योग, संशोधन आणि धोरणनिर्मिती यांमध्ये सक्रिय भूमिका बजावते. फिक्कीतर्फे शिक्षण क्षेत्रात जागतिक स्तरावर सहभाग वाढविणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता उंचावणाऱ्या संस्थांना गौरविण्यात येते. विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय व आंतरसांस्कृतिक वातावरण निर्माण करण्यासाठी शाश्वत प्रणाली विकसित करणे, परदेशी विद्यापीठे आणि संस्थांशी भागीदारी व सामंजस्य करार करणे, विद्यार्थी आणि प्राध्यापक देवाणघेवाण कार्यक्रम आयोजित करणे या निकषावर शिक्षण संस्थांचे मूल्यमापन केले जाते.
एक्सलेन्स इन ग्लोबलायझेशन हा पुरस्कार मुंबई विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, जागतिक दृष्टिकोन आणि अत्याधुनिक शैक्षणिक उपक्रमांच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. या पुरस्कारामुळे विद्यापीठाच्या जागतिक सहकार्य, संशोधन आणि नवोन्मेषाच्या उपक्रमांना नवे बळ मिळेल. विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना जागतिक स्तरावरील संधींचे नवे दालन खुले होईल.
z प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ