मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा दुसऱ्यांदा पुढे ढकलल्या, सुधारित वेळापत्रक जाहीर

महानगरपालिका निवडणुकानंतर राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुका 5 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. त्यामुळे या कालावधीत होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी 2025 सत्राच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील सुधारित वेळापत्रक विद्यापीठाने मंगळवारी सायंकाळी जाहीर केले. याआधी महानगरपालिका निवडणुकांमुळे परीक्षांच्या तारखा बदलण्यात आल्या होत्या आणि आता जिल्हा परिषद निवडणुकांमुळे पुन्हा त्यात सुधारणा करण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या 13 जानेवारी 2026 रोजीच्या पत्रानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठाचे विभाग प्रमुख, ठाणे व कल्याण उपकेंद्राचे संचालक, दूर व मुक्त अध्ययन संस्था (CDOE) आणि सर्व संलग्न महाविद्यालयांच्या प्राचार्यांना या बदलाची माहिती देण्यात आली आहे. परीक्षांच्या तारखा बदलल्या असल्या, तरी परीक्षेची वेळ पूर्वीप्रमाणेच राहणार आहे. त्यात कोणताही बदल झालेला नाही. सर्व महाविद्यालयीन प्राचार्य आणि विभाग प्रमुखांनी सुधारित तारखांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत त्वरित पोहोचवावी, असे निर्देश विद्यापीठाने दिले आहेत.

मुंबई विद्यापीठाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, 4, 5, 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा या अनुक्रमे 17, 18, 20 आणि 20 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहेत. विद्यार्थी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नवीन वेळापत्रक तपासू शकतात.