डान्स-मस्तीची धम्माल आणि बरंच काही…

63

कॉलेज कट्टय़ावर सध्या एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे कॉलेज फेस्टिव्हलची. वर्षभर तरुणाई अगदी आतुरतेने ज्या फेस्टिव्हलच्या धामधुमीची वाट पाहत असते तो ‘फेस्टिव्हल सीझन’ काही दिवसांवर येऊन ठेपल्याने या ‘इव्हेंट मॅनेजमेंट’साठी तरुणाईची धावपळ सुरू आहे. गुलाबी थंडीची चाहूल लागताच कॉलेजियन्सना वेध लागतात ते फेस्टिव्हलचे. त्यामुळे आपल्या कॉलेजचा इव्हेंट यशस्वी करण्यासाठी फेस्टिव्हलच्या थीमपासून बजेटपर्यंतची तयारी करण्यात सध्या विद्यार्थी गुंतले आहेत. रोजच्या अभ्यासाचे टेन्शन बाजूला ठेवून आपला इव्हेंट यशस्वी करण्यासाठी सगळ्यांचेच जोरदार प्रयत्न सुरू आहेत. वर्षभर लेक्चर, अभ्यास, प्रॅक्टिकल आणि परीक्षेच्या तणावाखाली असणाऱया कॉलेज तरुण-तरुणींना कॉलेज फेस्टिव्हल म्हणजे एक पर्वणीच असते. त्यामुळेच सगळी टेन्शन बाजूला ठेवून कॉलेजियन्स उत्स्फूर्तपणे सहभाग घेतात. या फेस्टिव्हलच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना आपले कलागुण दाखवण्याची नामी संधी मिळत असल्यामुळे विद्यार्थी प्रचंड उत्सुक असतात. अनेक महाविद्यालयांच्या फेस्टिव्हलमध्ये अनेक स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धांमध्ये मुंबईबाहेरील महाविद्यालये सहभागी होत असल्यामुळे या स्पर्धांमध्ये प्रचंड चुरस पाहायला मिळते.

आपली प्रतिक्रिया द्या