विधानभवनात शपथविधीची जोरदार तयारी

2415

राज्यात सत्तास्थापनेचा पेच सुरू असतानाच विधानभवन मात्र नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीसाठी सज्ज होत आहे. मंत्रिमंडळाचा शपथविधी वानखेडे की रेसकोर्स येथे होणार याबाबत तर्कवितर्क लढविले जात असतानाच विधानभवनात मात्र शपथविधीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. प्रवेशद्वारावरील मंडप, मीडियासाठीची विशेष व्यवस्था, रेड कार्पेट अशा तयरीनिशी विधिमंडळ शपथविधीसाठी सुसज्ज होतेय.

राज्यातील सत्तास्थापनेचे गणित जुळविण्यासाठी राज्यापासून दिल्लीपर्यंत जोरदार गाठीभेटी सुरू आहेत. मुख्यमंत्री तेच राहणार की नवीन मुख्यमंत्री होणार, शपथविधीच्या तारखा आणि ठिकाण याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. अशा परिस्थितीतच विधिमंडळात शपथविधीची जोरदार तयारी सुरू झाल्याने येत्या काही दिवसांतच सरकार स्थापन होणार याचे संकेत मिळू लागले आहेत. सध्या हंगामी सरकार अस्तित्वात आहे. 9 नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपत आहे. नवीन विधानसभा अस्तित्वात आणण्यासाठी आमदारांचा शपथविधीही होणे आवश्यक आहे. या विशेष अधिवेशनासाठी 6,7,8 नोव्हेंबर ही तारीख गृहीत धरण्यात आली असून त्या अनुषंगाने विधिमंडळ प्रशासनाने आमदारांच्या शपथविधीची जोरदार तयारी सुरू केली आहे.

मंत्रिमंडळाच्या शपथविधीची शक्यता
अद्याप सरकार अस्तित्वात आले नसल्याने राज्यपाल विशेष अधिकार वापरून हंगामी अध्यक्ष नेमू शकतात. त्या अध्यक्षांच्या उपस्थितीत अमादारांचा शपथविधीही पार पाडला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांसह मोजक्याच मंत्र्यांचा शपथविधी उरकून सत्ता स्थापन होण्याचीही शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या