मुंबई ‘फ्रीझ’ झाली! पारा 10 अंशांवर ढेपाळला , मुंबईकर पोहोचले‘सातच्या आत घरात’

847

गेल्या दोन दिवसांपासून उतरणीला लागलेला मुंबईचा पारा शुक्रवारी थेट 10 अंशांवर ढेपाळला. त्यामुळे मुंबई जणू प्रीझ बनली आणि मुंबईकरांना कुडकुडतच घर गाठावे लागले. अनेक नोकरदार संध्याकाळी ‘सातच्या आत घरात’ पोहोचले. शहर व उपनगरात गोरेगाव, पवई, बोरिवली, कांदिवली आदी जवळपास दहा ठिकाणी किमान तापमान 10 अंशांच्या खाली गेले.

दोन दिवसांपूर्वी महाबळेश्वरला मागे टाकणारा मुंबईचा पारा जम्मू-कश्मीरची हुडहुडी भरवतोय की काय अशी भीती मुंबईकरांना सतावत आहे. जानेवारीचा पहिला आठवडा थंडीने मुक्काम ठोकला. नंतर पुन्हा गायब झालेल्या थंडीचा जोर बुधवारपासून वाढला आहे. उत्तरेकडील थंडीच्या लाटेचा परिणाम मुंबईत जाणवत असून शहरात थंड आणि कोरडे वारे वाहत आहेत. शुक्रवारी गोरेगाव, पवई, बोरिवली आदी ठिकाणी किमान तापमान 10 अंशांवर गेले. पारा सरासरीपेक्षा सहा अंशांनी ढेपाळला. तसेच सांताक्रूझमध्ये 11.4 तर कुलाब्यात 14.5 अंश तापमान नोंद झाले. शहरात कमाल तापमानाच्या पातळीतही गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच सहा ते सात अंशांची घट झाली. या थंडीच्या कडाक्याने मुंबईकर आजारी पडण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

हवामान खात्याचा ऍलर्ट

थंडीची तीक्रता आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे हवामान खात्याने मुंबईकरांना ऍलर्ट केले आहे. ‘मॉर्निंग वॉक’साठी घराबाहेर पडणाऱया नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, किंबहुना ज्येष्ठांनी पहाटे घराबाहेर पडणे टाळावे असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.

राज्यात नाशिकमध्ये सर्वात कमी तापमान

राज्यात नाशिकमध्ये 6 अंश इतक्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. तसेच पुणे 8.2, अलिबाग 12.9, रत्नागिरी 14.1, नगर 9.2, जळगाव 7.0, कोल्हापूर 14.5, महाबळेश्वर 10.0, मालेगाव 8.2, सांगली 14.0, सातारा 10.2, सोलापूर 15.7, संभाजीनगर 8.1, परभणी 12.7, नांदेड 11.5, बीड 13.3, अकोला 12.4, अमरावती 14.0, बुलडाणा 11.4, ब्रह्मपुरी 14.0, चंद्रपूर 16.2, गोंदिया 13.6, नागपूर 15.1, वाशिम 13.6, वर्धा 17.6 आणि यवतमाळ 14.4 अशी तापमानाची नोंद झाली.

आपली प्रतिक्रिया द्या