गरजू महिलांना मिळणार ‘सौंदर्य’ खुलवण्याचा व्यवसाय; महापालिका देणार बचत गटांना ब्रॅण्डेड ब्युटी किट

107

मुंबईतील बचत गटातील गरजू महिलांना आता दुसऱया महिलांचे सौंदर्य खुलवण्याचा व्यवसाय करता येणार आहे. बचत गटातील ज्या महिलांनी जेंडर बजेटअंतर्गत महिला आणि बाल कल्याण योजनेतून मेकअप आर्टिस्ट आणि ब्युटिशियन कोर्स पूर्ण केला अशा महिलांना स्वयंरोजगारासाठी महापालिका ब्रॅण्डेड ब्युटी किट उपलब्ध करून देणार आहे.

गरीब, गरजू महिला, विधवा, दिव्यांग व्यक्ती यांना स्वयंरोजगारासाठी पालिका जेंडर बजेटअंतर्गत आर्थिक मदत करते. पालिका अर्थसंकल्पात त्यासाठी दरवर्षी भरीव तरतूद केली जाते. यंदाही घरघंटी, शिलाई मशीन आणि सौंदर्य प्रसादने खरेदीसाठी निधी दिला जाणार आहे. त्यानुसार 227 प्रभागांतील बचत गटांना सेवेचा लाभ मिळावा यासाठी यंदा सहा कोटी दहा लाखांच्या निविदा काढल्या, मात्र या निविदांना केवळ 50 बचत गटांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे सर्वच नगरसेवकांनी बचत गटांबद्दल नाराजी व्यक्त केली. पालिका प्रशासनाच्या धोरणामुळे महिला सक्षमीकरणाला खीळ बसत आहे. त्यामुळे महिला गटांऐवजी वैयक्तिकरीत्या महिलांना पूर्वीप्रमाणेच साहित्य देण्यात यावे तसेच देवदासी, दिव्यांगांना पेन्शन द्या, नगरसेवकांना या योजनेत सामावून घ्या, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक संजय घाडी, राजुल पटेल यांनी केली.

विशेष धोरण तयार करण्याचे स्थायी समिती अध्यक्षांचे आदेश

ज्या बचत गटातील महिलांनी मेकअप आर्टिस्ट आणि ब्युटिशियन कोर्स केला आहे अशा महिलांना दर्जेदार सौंदर्य प्रसाधने द्यावीत. त्यामुळे त्यांच्याकडे येणाऱया महिलांना कोणत्याही प्रकारची ऍलर्जी होणार नाही अशी मागणी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी केली. याची दखल घेत महिलांना सौंदर्य प्रसाधने ब्रॅण्डेड द्यावीत. त्यामुळे ऍलर्जी किंवा इतर काही तक्रारी निर्माण होणार नाही. योजनेसाठी विशेष धोरण तयार करावे, तशी सुधारणा करून हा प्रस्ताव पुन्हा सभागृहासमोर आणावा, असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पालिका प्रशासनाला दिले.

आपली प्रतिक्रिया द्या