राणीबागेत शिवानी अस्वलाला गारेगार कलिंगड, फ्रुट केक! वाढलेल्या उकाड्यात प्राण्यांना मेजवानी

565

मुंबईसह राज्यभरात उकाडा वाढलेला असताना पालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील प्राण्यांना थंडगार फळे, हिरवागार पाला, पालेभाज्या दिल्या जात आहेत. यामध्ये शिवानी अस्वलाला कलिंगड, फ्रुट केकची मेजवानी दिली जात असून हत्तींना थंडगार पाण्याची आंघोळही घातली जात आहेत.

मुंबईसह राज्यभरात सध्या पारा 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असून हवेत आर्द्रता वाढल्याने प्रचंड उकाडा जाणवत आहे. हा उकाडा पशु-पक्षांनाही असह्य होत आहे. त्यामुळे राणी बागेतील प्राण्यांनाही वाढलेल्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर फळे, पालेभाज्या, कलिंगड असा खाद्य दिले जात असल्याची माहिती उद्यानाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली. यामध्ये हरणांसाठी दररोज विविध प्रकारचा हिरवागार पाला आणला जात आहे. या शिवाय गाजर, भोपळा, चिकू, पेरू, कलिंगड अशी फळे टांगून ठेवली जात आहेत. अशी फळे आणि ताजा भाजीपाला मिळत असल्यामुळे हरणे, माकड यांच्यासह विविध प्रकारचे पक्षांची चांगलीच चंगळ होत आहे. यातच सध्या लॉकडाऊनमुळे राणीबाग बंद असल्यामुळे पर्यटकांमुळे नेहमीच दबकून राहणारे पशु-पक्षी स्वच्छंद विहार करीत आहेत.

अशी आहे व्यवस्था

राणी बागेत हरणांसाठी असणार्‍या स्वतंत्र जागेत नियमित खाद्याबरोबर कडाक्याच्या उन्हाळ्यात दिलासा देणारा हिरवागार पाला टांगून ठेवला जात आहे. शिवाय या ठिकाणी पाण्याची सोयही करण्यात आली आहे. शिवाय फळे आणि भाजलेले चणे, कडधान्यही ठेवले जात असल्यामुळे पक्षांचीही चांगलीच ‘सोय’ होत आहे. राणीबागेत सध्या नवीन आणलेल्या विदेशी पक्षांसह सुमारे 500 हून अधिक प्रकारचे पक्षी आहेत. अस्वलही फ्रुट केक, कलींगड अशी फळे चवीने खात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या