
मुंबईकरांचे घरांचे स्वप्न साकार करण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेतला. अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटांतील गरीबांसाठी घरे बांधल्याचा दावा केला. पण घराची किंमत ऐकूनच भोवळ येईल. 300 चौरस फुटाचे घर घेण्यासाठी एक कोटी रुपयांपेक्षाही जास्त किंमत मोजावी लागणार आहे.
मुंबई महानगरपालिका अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटांसाठी 426 घरांची विक्री सोडत पद्धतीने करणार आहे. या घरांसाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर आजपासून 14 नोव्हेंबरला सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. पात्र अर्जदारांची अंतिम यादी 18 नोव्हेंबरला सायंकाळी 5 वाजता जाहीर करण्यात येईल आणि सोडत प्रक्रिया 20 नोव्हेंबरला सायंकाळी 5 वाजता पार पडेल. यशस्वी अर्जदारांची यादी 21 नोव्हेंबरला जाहीर केली जाणार आहेत. अधिक माहितीसाठी 022-22754553 या क्रमांकावर किंवा मुंबई महापालिका मुख्यालयातील चौथ्या मजल्यावरील मालमत्ता सहाय्यक आयुक्त कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
चार हजार चौरस मीटरपेक्षा मोठय़ा भूखंडावर बांधकाम करताना पालिकेला यापूर्वी 20 टक्के प्रीमियम विकासकाकडून मिळत होता. मात्र पालिकेने विकास नियंत्रण नियमावलीत बदल करून प्रीमियमच्या बदल्यात घरे घेण्याचा निर्णय घेतला. नियम 15 अंतर्गत चार हजार चौरस मीटरपेक्षा मोठय़ा भूखंडावर बांधकाम करताना महापालिकेला 20 टक्के घरे अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटासाठी बांधणे बंधनकारक आहे. त्यानुसार महापालिकेला 426 घरे मिळाली.
भायखळा
अत्यल्प उत्पन्न गट
300 फुटांच्या घराची किंमत एक कोटींवर
गोरेगाव पिरामल नगर
अत्यल्प उत्पन्न गट
282 चौरस फुटाच्या घरांची किंमत 59 लाख 15 हजार रुपये