
हजारो कोटींचे कर्ज आणि तोटय़ात चाचपडत असलेल्या बेस्ट प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार उजेडात आला आहे. काही वर्षांपूर्वीच मुंबईच्या रस्त्यांलगत उभारलेले आणि अद्याप सुस्थितीत असलेले बसथांबे उखडून कोस्टल रोडच्या उड्डाणपुलाखाली फेकण्यात आले. हाजी अली परिसरात अशा बसथांब्यांचा ढीग साचला आहे. नूतनीकरणाच्या नावाखाली खासगी पंपनीच्या फायद्यासाठी बेस्ट प्रशासनाने अनेक सुस्थितीतील बसथांबे फेकल्याने मुंबईकरांकडून संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत.
बेस्ट प्रशासन सध्या नूतनीकरण प्रकल्पाचा भाग म्हणून शहरातील जवळपास 600 बसथांब्यांचे अपग्रेडिंग करत आहे. प्रकल्पांतर्गत बसथांब्यांवर मोफत वाय–फाय, लॅपटॉप आणि स्मार्टफोन चार्जिंग सुविधा, पारदर्शक दृश्यासाठी ग्लास फायबर शेड स्ट्रक्चर, जवळच्या लोकप्रिय ठिकाणांची आणि सार्वजनिक शौचालयांची माहिती असलेले क्यूआर कोड, महिलांना छळाची तक्रार करण्यासाठी अलार्म सिस्टम, अंधांसाठी स्पर्शिक मजले, स्मार्ट डिजिटल डिस्प्ले आदी सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. ‘साइनपोस्ट’ या खासगी पंपनीच्या 20 वर्षांच्या भागीदारीतून बेस्ट उपक्रम हा नूतनीकरण प्रकल्प राबवत आहे. संबंधित पंपनी अद्ययावत केलेल्या बसथांब्यांवर जाहिराती करून बक्कळ कमाई करू शकणार आहे. खासगी पंपन्यांच्या या फायद्यासाठी बेस्ट प्रशासनाने सुस्थितीतील अनेक बसथांबे उखडून फेकून दिले आहेत.
वाचनालयातील पुस्तके गायब!
वरळी येथील एक बसथांबा ‘जगातील सर्वोत्कृष्ट बसथांबा’ म्हणून अद्ययावत केला होता. या बसथांब्यावरील वाचनालयामध्ये पुस्तके ठेवण्यात आली होती, मात्र योग्य देखभालीअभावी वाचनालयातील पुस्तके गायब झाली आहेत. त्यामुळे नूतनीकरणावरील खर्च नेमका कोणाच्या फायद्यासाठी केला जात आहे, असा सवाल मुंबईकरांकडून उपस्थित केला जात आहे.





























































