
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. बुधवारी सायंकाळी नववर्षाच्या पूर्वसंध्येला ‘थर्टी फर्स्ट’च्या सेलिब्रेशनसाठी मुंबईच्या समुद्रकिनारी जनसागर उसळणार आहे. अगदी गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्हपासून जुहू चौपाटीपर्यंत आबालवृद्धांच्या उत्साहाला उधाण येणार आहे. हॉटेल्स-रेस्तराँमध्ये ‘थर्टी फर्स्ट’च्या पाटर्य़ा रंगणार आहेत. मुंबईकरांचे हे सेलिब्रेशन निर्विघ्न आणि सुखकर पार पाडण्यासाठी पोलिसांसह सर्वच यंत्रणा सेवेत तत्पर राहणार आहेत. यंदा तिन्ही रेल्वे मार्गांवरील विशेष लोकल फेऱ्यांसह भुयारी मेट्रो, मेट्रो वन आणि बेस्टच्या बसफेऱ्या रात्रभर धावणार आहेत. बेस्ट उपक्रमाने विविध बसमार्गांवर 25 जादा बसगाडय़ा चालवण्यास तयारी दर्शवली आहे.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
मुंबई पोलिसांनी शहरात तगडा बंदोबस्त ठेवला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची सर्वतोपरी काळजी पोलीस दलाकडून घेण्यात येत असून नागरिकांना देखील सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस दलातील 10 अपर आयुक्त, 38 पोलीस उपायुक्त, 61 सहाय्यक पोलीस आयुक्त, 2790 पोलीस अधिकारी, 14 हजार 200 अंमलदार असा तगडा बंदोबस्त शहरात ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर महत्त्वाच्या ठिकाणी एसआरपीएफ, क्युआरटी, बीडीडीएस, आरसीपी, होमगार्ड हे देखील बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत.




























































