मुंबईच्या पश्चिम सागरी किनाऱ्याला लाभणार सुरक्षेचे कवच, समुद्रावर राहणार 24 तास वॉच

<<< आशीष बनसोडे >>>

‘26/11’च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईच्या सागरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मात्र लवकरच हे चित्र बदलणार आहे. मुंबईच्या असुरक्षित असलेल्या या संवेदनशील पश्चिम सागरी किनाऱ्याला सुरक्षेचे कवच लाभणार आहे. कारण गिरगाव चौपाटीवर बोट स्टेशन उभे राहणार असून तेथे पोलिसांच्या बोटी 24 तास तैनात राहणार आहेत.

कुलाब्यापासून ते अगदी वरळी सागरी सेतू व त्यापुढे पश्चिम सागरी किनारा आहे. हा संपूर्ण पट्टा अत्यंत संवेदनशील आहे. गेट वे ऑफ इंडिया, नेव्ही नगर, बधवार पार्क, मरीन लाइन्स, गिरगाव चौपाटी, राजभवन, हाजी अली, समुद्री मार्ग तसेच वरळी सागरी सेतू अशी महत्त्वाची ठिकाणे या पश्चिम सागरी किनारी पट्ट्यात मोडतात. परंतु सुरक्षेच्या दृष्टीने हा सागरी किनारा रामभरोसे असल्याचे चित्र आहे. मुंबईत माझगाव आणि वांद्रे येथे सागरी जेट्टी आहे. या दोन ठिकाणांहून अख्या मुंबईच्या सागरी सुरक्षेसाठी गस्त घातली जाते. पोलिसांकडे गस्त नौका कमी असल्याने सुरक्षा व्यवस्था ठेवता येत नाही.

अशी असेल व्यवस्था

गिरगाव चौपाटीवर किनारपट्टीपासून आत 200 मीटरवर बोट स्टेशन म्हणजेच तरंगती जेट्टी उभारण्यात येणार आहे. त्या ठिकाणी मुंबई पोलिसांच्या चार बोटी कायमस्वरूपी 24 तास तैनात ठेवण्यात येणार.

चार बोटी लवकरच दाखल होणार

मुंबई पोलिसांच्या नौका विभागाकडे 13 गस्त नौका आहेत. त्यापैकी चार बोटी काही दिवसांपूर्वी कामकाजात दाखल झाल्या आहेत. डिसेंबरपर्यंत आणखी चार बोटी पूर्ण क्षमतेने दाखल होतील.

जिल्हाधिकाऱ्यांकडून डीपीडीसीमधून या बोट स्टेशनसाठी निधी मंजूर झाला आहे. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड (एमएमबी) हे बोट स्टेशन उभारणार आहे. त्यासाठी सीआरझेड तसेच आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर या कामासाठी खुल्या निविदा मागवल्या जातील.