कोकणी माणसाच्या भावना दुखावण्या प्रकरणी मुनव्वर फारूकीला मागावी लागली माफी

स्टँड-अप कॉमेडीयन आणि हिंदी बिग बॉस 17 चा विजेता मुनव्वर फारूकी कायम वादग्रस्त व्यक्तव्यांमुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी स्टँड-अप कॉमेडी दरम्यान कोकणी माणसाबद्दल केलेल वक्तव्य त्याला भोवले आहे. सर्व स्तरावरील लोकांनी त्याच्यावर दाखवलेल्या रोषामुळे त्याला कोकणी माणसाची जाहिर माफी मागावी लागली आहे.

आठवड्याभरापूर्वी मुनव्वर फारूकी याचा स्टँड-अप कॉमेडी शो झाला. या शोमध्ये महाराष्ट्रातील कोकणी समुदायावर एक टिपणी करताना अपशब्द वापरले होते. शोमधील त्याच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. हा व्हिडीओ पाहून केवळ कोकणी माणसांनीच नाही तर वेगवेगळ्या भागातील लोकांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली.

मुनव्वर फारूकीच्या या व्हिडीओमध्ये मुनव्वरने ‘कोकणी लोग *** बनाते है’ असे वक्तव्य केल्याने वादाला ठिणगी पडली. सामान्यांसोबतच राजकारण्यांनी देखील यामध्ये लक्ष घातले. मुनव्वरने कोकणी माणसाची जाहिर माफी मागवी अशी मागणी सर्व स्तरांतून करण्यात आली. यामध्ये राजकारण्यांनी लक्ष घातल्याने प्रकरण आणखी चिघळले.

या सगळ्या प्रकारानंतर मुनव्वरने सोशल मीडिया अकाउंटवर व्हिडीओ टाकत जाहिर माफी मागितली आहे. या व्हिडीओमध्ये, “मला काही गोष्टी स्पष्ट करायचा आहेत, काही दिवसांपूर्वी एक शो झाला. या शोमध्ये मी विनोद सांगण्याऐवजी, प्रेक्षकांशी संवाद साधण्यात व्यस्त होतो. प्रेक्षकांमध्ये विवध स्तरातील, भागातील मंडळी उपस्थित होती. यावेळी माझ्याकडून अनावधानाने झालेल्या वक्तव्याबद्दल मी माफी मागतो.” असे म्हटले आहे.

मुनव्वर याने स्वत:ची चूक मान्य करत सांगितले की, केलेल्या वक्तव्यामुळे काही लोक दुखावले गेले आहेत, मात्र कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता, असे सांगितले. त्याच्याकडून झालेल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त करत त्याने केलेल्या चूकीची माफी मागितली आहे.