गारगाई भागवणार मुंबईकरांची वाढती तहान, साडेतीन लाख झाडांसाठी चंद्रपूरला पर्यायी जागा

मुंबईची वाढती तहान भागवण्यासाठी पालिकेने गारगाई धरण बांधण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. हे धरण बांधण्यासाठी बाधित होणाऱ्या जागेतील झाडांची मोजणी सुरू झाली असून यासाठी वन विभागाला पालिका निधी देणार आहे. मुंबईला दररोज होणाऱ्या 3850 दशलक्ष पाणी पुरवठ्यात गारगाई धरणामुळे 440 दशलक्ष लिटर वाढीव पाण्याची भर पडणार आहे. या धरणामुळे बाधित होणाऱ्या सुमारे साडेतीन लाख झाडांच्या बदल्यात पर्यायी झाडे लावण्यासाठी चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी पत्रही देण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.

मुंबईकरांना मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो. मात्र मुंबईचा झपाट्याने होणारा औद्योगिक विकास आणि वाढणारी लोकसंख्या यामुळे पाण्याची मागणीही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या डॉ. एम.ए. चितळे यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ समितीच्या शिफारशीनुसार मुंबई महानगरपालिकेने मध्य वैतरणा प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर गारगाई प्रकल्प प्राधान्याने विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पासाठी खासगी जमीन खासगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेतली जाणार आहे.

840 हेक्टर क्षेत्र बाधित होणार

गारगाई प्रकल्पामुळे एपूण 840 हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहे. यात सुमारे 424 हेक्टर खासगी जमीन वाटाघाटींद्वारे थेट खरेदी पद्धतीने अधिग्रहित करण्यात येणार आहे. या कामाचा अंदाजित खर्च 147.79 कोटी आहे. या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या 619 पुटुंबांचे पुनर्वसन आवश्यक परवानग्या घेऊन करण्यात येणार आहे.

मुंबईकरांसाठी गारगाई, पिंजाळ आणि दमणगंगा असे एपूण तीन नवीन जल प्रकल्प सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. या तीन प्रकल्पांतून मुंबईकरांसाठी प्रतिदिन 2891 दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. मात्र मनोरी येथे प्रस्तावित समुद्राचे पाणी गोड करण्याच्या प्रकल्पाच्या दोन टप्प्यात प्रत्येकी 200 दशलक्ष लिटर याप्रमाणे पाणी मिळणार आहे. त्यामुळे तूर्तास प्रस्तावित तीन प्रकल्पांपैकी गारगाई प्रकल्पाला गती देण्यात येत आहे.