
सांगली महापालिका प्रशासनाकडून आज अतिक्रमणांवर हातोडा मारण्यात आला. वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे बुलडोझरने तोडण्यात आली. पालिकेच्या या भूमिकेचे सांगलीकरांनी स्वागत केले. कोल्हापूर रस्ता आणि मारुती चौक रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यात आली. यावेळी खोकीधारक, विक्रेते आक्रमक झाले होते. मात्र, महापालिकेने आपली भूमिका ठाम ठेवत अतिक्रमणांवर हातोडा टाकला.
कोल्हापूर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरुवात केली आहे. 35 मीटरने पुन्हा रेखांकन केल्यानंतर शास्त्र्ााr चौकापासून भारतभीम ज्योतिराम दादा कुस्ती आखाडा परिसरातील अतिक्रमणे हटवण्यासाठी महापालिकेने पुरेसा वेळ दिला होता. त्यानंतरही अतिक्रमणे हटवली नाहीत, त्यामुळे कुस्ती आखाडय़ाच्या पश्चिम बाजूचे अतिक्रमण महापालिकेच्या वतीने हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही अतिक्रमणे हटविली.यावेळी खोकीधारकांनी विरोध केला. सदरची खोकी कुस्ती आखाडा परिसरात स्थलांतरित करा, अशी मागणी केली.त्यानंतर कुस्तीपटूंनी धाव घेत खोक्यांचे पुनर्वसन करू नये, अशी मागणी केली. त्यानंतर पथकाने खोकी हटविण्यास सुरुवात केली.