
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सुरळीत पार पडण्यासाठी पालिकेने 2017 च्या तुलनेत यावेळी तब्बल 2 हजार 927 मतदान केंद्रांची वाढ केली आहे, तर इलेक्शन डय़ुटीसाठीदेखील 28 हजार कर्मचारी वाढवले आहेत. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीसाठी मुंबईत 7 हजार 304 मतदान केंद्रे तर 41 हजार 980 कर्मचारी इलेक्शन डय़ुटीवर होते. 15 जानेवारी होणाऱ्या मतदानात 1 कोटी 3 लाख 44 हजार 315 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
पालिकेच्या माध्यमातून निवडणुकीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. यासाठी पालिकेच्या सुमारे सवा कोटी कर्मचाऱ्यांमधील सुमारे 70 हजार कर्मचारी-अधिकाऱ्यांची इलेक्शन डय़ुटीसाठी नेमणूक करण्यात आली आहे. या सर्वांना सध्या प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण घेणे कर्मचाऱ्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. गैरहजर राहिल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही पालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे. प्रत्येक प्रभागातील लोकसंख्या, मतदारांची संख्या आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी दिली.
मतदारांसाठी सुविधा
n मतदान प्रक्रियेत कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
n मतदान केंद्रांवर वीज पुरवठा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृहे, रॅम्प आदींची सुविधा करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी याची पाहणी, पडताळणी केली आहे. मतदारांना त्यांचे नाव शोधण्यासाठी केंद्राजवळ ‘मतदार सहाय्य केंद्र’ असेल.






























































