खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून पालिका कर्मचाऱ्याची आत्महत्या

कोपरगाव नगरपालिकेच्या मार्केट विभागाचे प्रमुख सोपान निवृत्‍ती शिंदे यांनी खाजगी सावकारांकडून कर्ज घेतले होते. ते कर्ज, भरमसाठ व्याज व सावकाराकडून होणारा नेहमीचा तगादा या जाचाला कंटाळून विषारी औषध घेऊन सोमवारी रात्री आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी मृत सोपान निवृत्ती शिंदे (वय 53, रा. श्रद्धानगरी, कोपरगाव) यांचा मुलगा राहुल सोपान शिंदे याने मंगळवारी कोपरगाव पोलीस ठाण्यात माहिती दिली.

माझे वडील सोमवारी सकाळी नगरपालिकेत जातो, असे सांगून गेले. ते मंगळवारी माधवनगर येथील मैदानात बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले.कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल डी.आर.तिकोणे पुढील तपास करीत आहेत. मृत सोपान निवृत्ती शिंदे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, जावई भाऊ,बहीण असा परिवार आहे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयांमध्ये शवविच्छेदन होऊन दुपारी त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तालुक्यातील जवळके या जन्मगावी त्यांच्या पार्थिवावर दुपारी चार वाजता त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या