
जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी पालिका कर्मचाऱयांनी आज आझाद मैदानात धडक आंदोलन केले. यावेळी शेकडो कर्मचारी या मोर्चात सहभागी झाले होते. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेसह विविध पालिका कर्मचारी संघटनांनी या मोर्चात सहभाग घेतला. मोर्चादरम्यान समन्वय समितीने पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी आयुक्तांनी जुन्या पेन्शनसाठी पालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी सांगितले.
जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना युनियनच्या वतीने आधीपासूनच खाते, विभाग, रुग्णालय स्तरावर मीटिंग घेऊन जनजागृती करण्यात आली आहे. त्यामुळे 5/5/2008 नंतर महापालिका सेवेत रुजू झालेल्या सर्व कामगारांना ही योजना लागू होईल असा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेला विश्वास आहे. त्यामुळे सर्व संघटनांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन म्युनिसिपल कर्मचारी कामगार संघटनांना केले होते.
यानुसार समन्वय समितीच्या माध्यमातून आझाद मैदानात धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी समन्वय समितीचे वामन कविस्कर, अशोक जाधव, बाबा कदम, सत्यवान जावकर, प्रकाश देवदास, बा.शि. साळवी, दिवाकर दळवी, शेषराव राठोड, संजिवन पवार, के.पी. नाईक, शरद सिंह यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी, कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
…तर पालिका कर्मचाऱ्यांचेही आंदोलन
मुंबई महानगरपालिका स्वायत्त असल्याने प्रशासनाने आपल्या पातळीवर आपल्या कर्मचासाठी निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी आयुक्तांकडे करण्यात आली. तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपाला पाठिंबा असल्याचेही समन्वय समितीकडून सांगण्यात आले. तर पालिका आयुक्तांनी अद्याप एनपीएमध्ये पेन्शनची रक्कम गुंतवणूक केलेली नाही, त्यामुळे ही रक्कम जुन्या पेन्शन योजनेत गुंतवून पालिका कर्मचाऱयांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी करण्यात आली. तर सरकारने मागणीकडे दुर्लक्ष केल्यास पालिका कर्मचारीदेखील आंदोलन करतील असा इशाराही आंदोलनादरम्यान देण्यात आला आहे.