
एल्फिन्स्टन पुलाच्या पुनर्बांधणी कामात कंत्राटदाराने हलगर्जीपणा केल्याने रविवारी दुपारी प्रभादेवीतील महापालिकेची मुख्य पाईपलाईन फुटली आणि लाखो लिटर पाणी वाया गेले. विशेष म्हणजे, कंत्राटदाराचे कामगार पाईपलाईन दुरुस्तीसाठी संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा न करताच निघून गेले. त्यामुळे प्रभादेवी रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचून तळय़ाचे स्वरूप आले.
बराच वेळ पाण्याचा प्रवाह सुरू राहिल्यामुळे चिखलाचे साम्राज्य झाले. त्याचा त्रास रेल्वे प्रवासी, नोकरदार आणि स्थानिक नागरिकांना झाला. शिवसैनिकांनी तातडीने तेथे धाव घेऊन नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रयत्न केले. ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पुलाचा रेल्वे मार्गिकेवरील लोखंडी सांगाडा अलीकडेच हटवण्यात आला, मात्र रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूकडील पुलाचे अवशेष हटवण्याचे काम बाकी आहे. जेसीबी, व्रेनच्या सहाय्याने काम करीत असताना कंत्राटदाराच्या कामगाराकडून हलगर्जीपणा झाला आणि पालिकेची मुख्य पाईपलाईन फुटली. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या पाईपलाईनमधून एल्फिन्स्टन परिसर व प्रभादेवीच्या विविध भागांमध्ये पाणीपुरवठा केला जातो. ही मुख्य पाईपलाईन फुटल्याने त्यातून लाखो लिटर पाणी वाया गेले.
नागरिकांच्या मदतीला शिवसैनिक धावले!
पाईपलाईन फुटल्यामुळे परिसरातील पाणीपुरवठय़ावर मोठा परिणाम झाला. त्याची माहिती मिळताच शिवसेना नगरसेवक निशिकांत शिंदे, महिला आघाडीच्या शैलजा पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक शिवसैनिकांनी नागरिकांच्या मदतीसाठी धाव घेतली. रेल्वे स्थानक परिसरात साचलेल्या पाण्यातून नागरिकांना ये-जा करता यावी यासाठी लाकडी फळय़ा जागोजागी ठेवण्यात आल्या. तसेच अनेक शिवसैनिक स्वतः तेथे उभे राहून ज्येष्ठ नागरिक, रुग्णांना मदत करीत होते. शिवसैनिकांच्या पाठपुराव्यानंतर रात्री उशिराने पालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
शिवसेनेतर्फे संबंधित यंत्रणांना निवेदन देणार
एल्फिन्स्टन पुलाच्या कामात वेळोवेळी हलगर्जीपणा दिसून येत आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी काम हाती घेतले जाते, मात्र पाणीपुरवठा व अन्य गोष्टींची खबरदारी घेतली जात नाही हे संतापजनक आहे. पाईपलाईन फुटून किती एमएलडी पाणी वाया गेले याची कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेला चिंता पडलेली नाही. पाईपलाईन फुटण्याला जबाबदार कोणाला धरायचे? याबाबत आपण पालिका आयुक्त तसेच संबंधित यंत्रणांना निवेदन देणार आहोत, असे नगरसेवक निशिकांत शिंदे यांनी सांगितले.




























































