परिचारिकांना महिन्याला आठ रजा लागू करण्यास पालिका सकारात्मक, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या पाठपुराव्याला यश

महापालिकेच्या शीव, नायर, केईएम या सारख्या मुख्य रुग्णालयांप्रमाणे विशेष आणि सर्वसाधारण रुग्णालयातील परिचारिकांनाही महिन्याला सहाऐवजी आठ रजा देण्याबाबत पालिका प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. याबाबत म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने औद्योगिक न्यायालयासह पालिका प्रशासनाकडे गेले तीन वर्षे पाठपुरावा केला होता. दरम्यान, याची 1 जूनपासून अंमलबजावणी करा, अशी मागणीही संघटनेने केली आहे.

परिचारिकांना महिन्याला आठ रजा लागू व्हाव्या यासाठी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, सरचिटणीस सत्यवान जावकर, सरचिटणीस अ‍ॅड. रचना अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली 2023 पासून महापालिकेच्या सर्वच रुग्णालयांतील परिचारिकांनी एकजुटीने न्यायिक रजेबाबत उत्स्फूर्तपणे निदर्शने केली होती. याबाबत औद्योगिक न्यायालयानेही परिचारिकांमध्ये कोणताही भेदभाव न करता त्यांना महिन्याला आठ रजा देण्याचे आदेश दिले होते, मात्र या आदेशाची अंमलबजावणी करण्यात पालिका प्रशासन चालढकल करत होते. या पार्श्वभूमीवर नुकतेच वैद्यकीय शिक्षण संचालकांच्या नायर दंत रुग्णालय येथील दालनात पालिका उपायुक्त (आरोग्य) शरद उघडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत सर्व प्रमुख रुग्णालयाचे अधिष्ठाता, प्रमुख वैद्यकीय अधीक्षक, कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्याबरोबर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

समान काम, समान वेतनश्रेणीनुसार रजा

समान काम, समान वेतनश्रेणी व समान कर्तव्यवेळ असूनही प्रशासन एकाच प्रवर्गातील परिचारिकांमध्ये भेदभाव करत आहे. सर्वांना आठ रजा मंजूर करून 1 जूनपासून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने सरचिटणीस अ‍ॅड. रचना अग्रवाल, उपाध्यक्षा रंजना नेवाळकर, चिटणीस वृषाली परुळेकर, मंगल तावडे यांनी केली. त्याला पालिका प्रशासनाने सकारात्मकता दर्शवली.