
राम भालेराव । जालना
भावजयीला पळवून नेऊन परत ३-४ दिवसांनी गावात आणल्याच्या संशयावरून सासूसह दोन दिरांनी रामसिंग शामसिंग खोकड (१७) यास घरात घुसून लोखंडी पाईप, कुऱ्हाड व विळ्याने बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या रामसिंग खोकड यांला उपचारासाठी संभाजीनगरला नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. संतप्त नातेवाईकांनी आरोपींच्या अटकेसाठी जालना जिल्ह्यातील अंबड पोलिस ठाण्यात रामसिंगच पे्रत आणले. पोलिसांनी तात्काळ एका आरोपीस अटक केली तर दोघांना लवकरच अटक करू, असे आश्वासन दिले. हा प्रकार बुधवारी दुपारी घडला.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कर्जत येथील राजपुत वस्तीतील एका विवाहितेस सुमारे ३ महिन्यापूर्वी तिच्या भावकीतील रामसिंग उर्फ राहुल शामसिंग खोकड याने जालना येथे नेले होते. तीन-चार दिवसांनी पुन्हा दोघेही परत गावात आले. याचा राग मनात धरून मंगळवारी विवाहितेची सासू व दोन दिरांनी कर्जत येथे रामसिंग यास घरात घुसून, लोखंडी पाईप, कुऱ्हाड व लोखंडी विळ्याने मारहाण केली. गंभीर जखमी रामसिंग याला उपचारासाठी संभाजीनगर येथे नेत असताना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला.
बुधवारी जालना जिल्हा रुग्णालयात शव विच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांकडे रामसिंगचा मृतदेह सोपविण्यात आला. संतप्त नातेवाईकांनी प्रेत अंबड पोलिस ठाण्यात आणून आरोपींना अटक केल्याशिवाय अंत्यविधी करणार नाही, असा पवित्रा घेतला. यावेळी पो.नि. अनिरूध्द खांडेकर यांनी नातेवाईकांची समजुत काढली व एका आरोपीस ताब्यात घेतल्याचे सांगितले. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात मयत रामसिंग याची आई यमुना शामसिंग खोकड यांच्या फिर्यादीवरून पुनम मच्छाराम खोडक, रमेश मच्छाराम खोडक व ढवळाबाई शामसिंग खोकड यांच्याविरूध्द भादंवि कलम ३०२, ४५२, ३४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक एस.एम.शेख करीत आहे.


























































