नशेत पत्नीची हत्या केली; मृतदेह मांडीवर घेऊन रात्रभर रडत बसला…

हत्या केल्यानंतर आरोपी फरार होतात किंवा आतमहत्या करतात. मात्र, उत्तर प्रदेशात एकाने स्वतःच्या पत्नीची हत्या केली आणि तिचे डोके मांडीवर घेऊन रात्रभर रडत बसला. या घटनेने पोलीसही चक्रावले आहेत. ही हत्येची घटना असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपासानंतर अधिक माहिती देण्यात येईल, असे सांगितले.

उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील बिलाबा गावात ही घटना घडली आहे. देशराज गुजरातमध्ये नोकरीला आहे. तो रविवारी घरी परतला होता. दिवसभर तो पत्नी उमा आणि 4 वर्षांच्या मुलासोबत होता. त्यानंतर संध्याकाळी तो घराबाहेर गेला होता. रात्री त्याच्या रडण्याच्या आवाजाने शेजाऱ्यांना जाग आली. तो पत्नीचे डोके मांडीवर घेऊन रडत असल्याचे शेजाऱ्यांना दिसले. त्यांनी घरात जाऊन बघितले असता उमाचा मृत्यू झाला होता आणि तिचा मृतदेह मांडीवर घेऊन देशराज रडत होता. शेजाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

देशराजने मद्यपान केल्याचे शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. प्राथमिक तपासात मृतदेहाच्या गळ्यावर व्रण असल्याने ही हत्येची घटना असल्याचे पोलिसांनी सांगितले. दारूच्या नशेत देशराजने पत्नीची गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर तिचा मृतदेह मांडीवर घेऊन रात्रभर रडत असावा, असे पालिसांनी सांगितले. पोलिसांनी प्राथमिक चौकशीनुसार पाचजणांविरोधात हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे. उमाच्या माहेरच्यांना घटनेबाबत कळवण्यात आले आहे. ते आल्यानंतर अधिक माहिती मिळाल्यावर ही हुंडाबळीची घटना आहे किंवा नाही ते स्पष्ट होईल आणि पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी देशराजला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. या हत्येच्या कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या