जंजिरा किल्ल्यावर जाताय सावधान… चेंगराचेंगरीची भीती

2033

जंजिरा किल्ला पूर्वी तिकिटाविना पाहावयास मिळत होता. मात्र मागील काही महिन्यांपासून पुरातत्व खात्याने तिकीट आकारण्यास सुरुवात केली. मात्र ही खिडकी किनाऱ्यावर न उभारता किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आली आहे. त्यामुळे तिकीट काढताना अनेकदा झुंबड उडत असल्याने अक्षरशः चेंगराचेंगरी होते. प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात आहे.

सुट्टीच्या हंगामात दिवसभरात लाखो पर्यटक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी भेट देतात. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून म्युझियम तिकीट 25 रुपये प्रत्येक व्यक्तीला आकारून किल्ला पाहण्यासाठी सोडले जाते. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर लोखंडी दरवाजा बसविण्यात आला असून निम्मी जागाही त्यात व्यापली गेली आहे. त्यामुळे प्रवेशद्वारावर अपुरी जागा असल्याने चेंगराचेंगरीचे प्रकार घडतात. तिकीट सुविधा ऑनलाइन असल्यामुळे तिकीट मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे पर्यटकांना ताटकळत उभे राहून प्रतीक्षा करावी लागते. यातच पर्यटकांचा अर्ध्याहून अधिक वेळ निघून जात असल्याने त्यांना किल्ला पाहण्यास वेळ कमी मिळत असल्याची खंत पर्यटक व्यक्त करत आहेत. पर्यटकांबरोबर स्थानिक बोट व्यावसायिकांनासुद्धा याचा त्रास होत आहे. यातून सुटका करण्यासाठी ही तिकीट खिडकी किनारपट्टीवर करण्याची मागणी करत आहेत.

किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांसाठी वैद्यकीय सुविधा, पिण्याचे पाणी नाही तसेच प्रसाधनगृहाची बोंब आहे, तर ऐतिहासिक ठिकाण दर्शविणारे फलक, खरा इतिहास सांगणारे गाईड उपलब्ध नाहीत. मग प्रवेश शुल्क का, असा सवाल पर्यटकांनी विचारला आहे. पुरातत्व विभाग दरवर्षी जंजिरा किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवते. मात्र यंदा किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविलीच गेली नाही. त्यामुळे किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढले असून याचा त्रास पर्यटकांना सहन करावा लागत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या