
प्रख्यात संगीतकार नरेंद्र भिडे यांचे गुरुवारी पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते 47 वर्षांचे होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे चित्रपट आणि नाटक क्षेत्रात शोकाचे वातावरण आहे.
सिव्हिल इंजिनियरची पदवी घेतलेल्या नरेंद्र भिडे यांनी अनेक नाटक, मालिका, मराठी चित्रपट संगीतबद्ध केले आहेत. भिडे यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण उस्ताद महंमद हुसेन खान साहेब, स्वरराज छोटा गंधर्व, बाळासाहेब मते, शैला दातार, सुधीर दातार, सुहास दातार यांच्याकडे तर पाश्चिमात्य संगीताचे शिक्षण हेमंत गोडबोले यांच्याकडे घेतले. त्यांना सह्याद्री सिने अवॉर्ड, राज्य नाट्य पुरस्कार (दोन वेळा), व्ही शांताराम पुरस्कार, श्रीकांत ठाकरे पुरस्कार, राज्य चित्रपट पुरस्कार आदि विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मुळशी पॅटर्न, रानभूल, त्या रात्री पाऊस होता, हिप हिप हुरे, पाऊलवाट , अनुमती , दिल ए नादान (बायोस्कोप) , देऊळ बंद, कलम 302, साने गुरुजी, शासन सिंहासन, चौदहवी का चाँद, आंधळी कोशिंबीर या चित्रपटांना तसेच कोण म्हणत टक्का दिला?, माकडाच्या हाती शॅम्पेन, काटकोन त्रिकोण, चिरंजीव आईस, चांदणे शिंपीत जा, हमीदाबाईची कोठी, जोडी तुझी माझी, एक झुंज वाऱ्याशी, गोडी गुलाबी, फायनल ड्राफ्ट, लव्ह बर्डस , व्हाईट लिली अँड नाईट रायडर, अलीबाबा आणि ४० चोर या नाटकांना त्यांनी पार्श्वसंगीत दिले.
मनाला चटका लावणारी घटना!
“कारकीर्द ऐन भरात असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने तरुण, प्रतिभावान संगीत दिग्दर्शक नरेंद्र भिडे यांचे झालेले आकस्मिक निधन हे चटका लावणारे आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली”, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
“भिडे यांनी अनेक नाटकं, मालिका, मराठी चित्रपट संगीतबद्ध केले होते. त्यांचे योगदान रसिकांच्या सदैव स्मरणात राहील”, असेही देशमुख यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.


























































