नुसरत जहाँच्या दुर्गा पुजेवर मुस्लीम धर्मांधाची आगपाखड

719

तृणमूल खासदार नुसरत जहाँला पुन्हा मुस्लीम धर्मांधांनी लक्ष्य केले आहे. नुसरतने हिंदू वेशात दुर्गापूजा केल्याने मुस्लीम उलेमांनी आगपाखड केली आहे. नुसरत मुस्लीम धर्म बदनाम करत आहे अशी टीका काही उलेमांनी केली आहे. त्यावर नुसरतनेही उलेमांना तोडीस तोड उत्तर दिले आहे. असे सल्ले देण्याचा त्यांना काहीच हक्क नाही, अशी प्रतिक्रिया नुसरतने दिली आहे.

बंगली अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँ हिने आपला पती निखिल जैन सोबत दुर्गापूजेला हजेरी लावली. तिथल्या सोहळ्याची खास क्षणचित्रे तिने आपल्या सोशल मीडियावरही पोस्ट केली. त्यावरून देवबंदच्या उलेमांनी चांगलीच नाराजी दर्शवली. नुसरतने आपले नाव बदलावे अशी सूचना त्यांनी नुसरतला केली.

देवबंदचे उलेमा म्हणाले की, नुसरत धर्मविरोधी काम करत आहे? इस्लाममध्ये अल्लाह सोडून कुठल्याही देवाची आराधना करणे हराम आहे. जर नुसरतला असे काही करायचे आहे तर ती आपले नाव का नाही बदलत. तिच्या अशा वागण्याने इस्लाम आणि मुस्लिमांचा अपमान होत आहे.

याप्रकरणी इत्तेहाद उलमा-ए-हिंदचे उपाध्यक्ष मुफ्ती असद कासमी म्हणाले की “नुसरतने अशा प्रकारे आधीही पूजा केलेली आहे. अशा प्रकारच्या वागण्याला इस्लाममध्ये बिल्कूल थारा नाही. जर नुसरतला अशाच प्रकारे धर्मविरोधी काम करायचे असेल तर तिने आपले नाव बदलले पाहिजे. यामुळे इस्लाम आणि मुस्लीम दोन्ही बदनाम होत असल्याची प्रतिक्रिया कासमी यांनी दिली.

या प्रकरणी नुसरतने उलेमांना जोरदार उत्तर दिले आहे. नुसरत म्हणाली की “ज्यांनी मला माझे नाव दिले नाही. त्यांना माझे नाव बदलण्याचा काही हक्क नाही. हा प्रश्न हिंदू-मुस्लीम नाहिये. मौलवींना मी सांगू इच्छिते की त्यांनी आराम करावा. ही वेळ आनंद साजरा करण्याची आहे, राजकारण करण्याची नाही, असं सणसणीत उत्तर नुसरत हिने दिलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या